मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का, मुख्यमंत्र्यांकडून मंजूर कामांना स्थगिती
मंत्री अतुल सावे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिला आहे. अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या सगळ्या कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. भाजपाचे आमदार तुषार राठोड यांनी अतुल सावे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. तसेच मुख्यमंत्र्यांनी तुषार राठोड यांकया तक्रारीनंतर अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अतुल सावे यांनी नांदेड जिल्हयातील कामांना मंजूरी दिली. मात्र राठोड यांच्या तक्रारीनंतर नांदेडच्या तांडा वस्तीच्या 7 कोटी 25 लाखांच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. विश्वासात न घेता अतुल सावे यांनी तांडा वस्तीच्या कामांना मंजूरी दिल्याची तक्रार तुषार राठोड यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने अतुल सावे यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात तिढा असलेला बघायला मिळाला. जागावाटपावरुनही महायुती सरकारमध्ये रस्सीखेच बघायला मिळाली. त्याच प्रमाणे नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील अद्याप निश्चित झाले नाहीत. त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या आरोग्य विभगातील सुमारे 3200 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता सावे यांनी मंजूरी दिलेल्या कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाल्या आहेत.