Naresh Mhaske
Naresh Mhaske

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना बुधवारी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आज म्हस्के आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
Published by :

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना बुधवारी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आज म्हस्के आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं. म्हस्के म्हणाले, तरुण पिढी राजकारणापासून अलिप्त राहत आहे, त्यांना दिलासा देण्याचं काम उमेदवारीच्या माध्यमातून झालं आहे. रस्त्यावर उतरुन लोकांसाठी काम केलं, तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो. महाराष्ट्रातील तरुणांना दिशा देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

नरेश म्हस्के माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी सुरुवातीच्या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होतो. त्यावेळी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं आहे. ठाण्यात नेतृत्व करण्याची संधी मला राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आंदोलनं केली आहे. ज्या ज्या वेळी आंदोलन केली, माझ्यावर प्रसंग आले, त्यावेळी राज साहेबांनी माझी पाठ थोपटली आहे. त्या शाबसकीच्या कौतुकामुळेच मी पुढे गेलो. आज खूप आनंद झाला आहे. ज्या माणसाच्या हाताखाली काम करायला संधी मिळाली, त्या व्यक्तीचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. राज ठाकरेंची सभा प्रचाराला दिशा देण्याचं काम करते. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम करते. त्यामुळे सभेची मागणी केली आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत, यावर प्रतिक्रिया देताना नरेश म्हस्के म्हणाले, नाराजी अजिबात नाही. आजही धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, त्यावेळी निरंजन डावखरे, संजय वाघुले, भाजपचे ठाण्यातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यात भाजपच्या बैठका होत आहे. सर्वजण एकत्र आहेत.

तुमच्या विरोधात राजन विचारे उभे आहेत, यावर प्रतिक्रिया देताना म्हस्के म्हणाले, त्या उमेदवारासाठी आम्हीच पत्रक वाटली आहेत. त्यांच्या रॅलित आम्हीच झेंडे लावले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांचं अव्हान वाटत नाही. ठाण्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं जाळं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम ठाण्यात बोलतंय. ठाणे बदलतयं, हे ठाणेकरांना माहित आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची हॅट्ट्रीक करायची आहे, त्यासाठी लोक उत्सुक आहेत. सर्वसाधारण कार्यकर्ता विरुद्ध हायप्रोफाईल उमेदवार अशी ही लढत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com