NCP : २० दिवसांच्या विलंबानंतर राष्ट्रवादी गटनोंदणी मार्गावर; सईदा खान गटनेत्या
मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडून तब्बल २० दिवस उलटले असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची अधिकृत गटनोंदणी रखडलेली होती. या विलंबामुळे महापालिकेतील राजकीय गणितांबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, आज कोकण आयुक्त कार्यालय, बेलापूर येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची अधिकृत नोंदणी करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे एकूण तीन नगरसेवक निवडून आले आहेत. या तीनही नगरसेवकांची वैयक्तिक नोंदणी गुरुवारी पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप गट म्हणून या नगरसेवकांची नोंदणी झालेली नव्हती. महापालिकेतील कामकाज, समित्यांवरील प्रतिनिधित्व आणि पक्षाची अधिकृत भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी गटनिर्मिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या नोंदणीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या गटाच्या गटनेत्या म्हणून डॉ. सईदा खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सईदा खान या अनुभवी नेत्या असून त्या नवाब मलिक यांच्या बहीण आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत पक्षाची भूमिका ठामपणे मांडली जाईल, असा विश्वास पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. गटनेतेपदाची नियुक्ती झाल्यानंतर गटनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा होती, मात्र काही अनपेक्षित कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली.
मूळत: २८ जानेवारी रोजी डॉ. सईदा खान या गटनोंदणीसाठी कोकण आयुक्त कार्यालयात जाणार होत्या. मात्र त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रमुख नेते अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती. पक्षाच्या शोकाकुल वातावरणामुळे आणि संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गटनोंदणीची प्रक्रिया तात्पुरती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची पुनर्रचना, संघटनात्मक निर्णय आणि पुढील दिशा यावर चर्चा सुरू होती. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील गटनोंदणी प्रक्रिया काही काळ थांबवण्यात आली. आता परिस्थिती स्थिर झाल्यानंतर आणि पक्षांतर्गत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज अखेर ही गटनिर्मिती औपचारिकरित्या केली जाणार आहे.
आज बेलापूर येथील कोकण आयुक्त कार्यालयात गटनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला महापालिकेत अधिकृत मान्यता मिळेल. यानंतर महापालिकेतील विविध समित्यांमध्ये पक्षाचा सहभाग, भूमिका आणि धोरणात्मक निर्णय अधिक प्रभावीपणे मांडता येणार आहेत. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
