Navneet Rana
Navneet Rana

अमरावतीत फुलणार कमळ? नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर लढणार निवडणूक; म्हणाल्या, "युवा स्वाभिमानची..."

अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
Published by :

लोकसभा निवडणुकीसाठी येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागू होणार असून सर्वच पक्षांमध्ये उमेदवार घोषीत करण्याची लगबग सुरु झाली आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं समोर आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला असल्याचं समजते.

याबाबत नवनीत राणा यांनी लोकशाहीला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्याच्यापुढे मी कधीच जाणार नाही. पण त्यांच्या सोबत आमची युवा स्वाभिमानची जी कोअर कमिटी आहे, त्यांच्यासोबत रवी राणा हे आमदार आहेत. ते या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि मी याच पक्षाची खासदार आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून या क्षेत्रात काम करत आहे. जे नेते ठरवतील तसं मी काम करेन. तसंच आमदार रवी राणा लोकशाहीशी बोलताना म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, त्यावर पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल. बैठकीत या प्रस्वावाबाबत चर्चा झाली आहे. त्यानुसार पुढील निर्णय आम्ही घेऊ.

शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनीही लोकशाहीला प्रतिक्रिया दिली, यावर ते म्हणाले, "भारतीय जनता पार्टीच्या यादीत त्यांचं नाव नाहीय, असं मला वाटतं. भाजपच्या कोणत्याही नेत्यानं तिकीट दिल्याचं कन्फर्म नाहीय. अमरावतीच्या जनतेला माहितीय, रवी राणा आणि नवनीत राणा यांची सवय काय आहे, प्रत्येक वेळी ते अशाच प्रकारचे संकेत देत असतात. अमरावतीमधून शिवसेनेनं सातवेळा निवडणूक लढवली.

माझे वडील आनंदराव अडसूळ पाचवेळा खासदार राहिले आहेत. नवनीत राणांनी मागील निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने लढवली होती. जनतेचा त्यांना विरोध आहे. यशोमती ठाकूर, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, राजकुमार पटेल, आनंदराव अडसूळ, बलवंत वानखेडे, संजय खोडके या सर्वांचा विरोध लक्षात घेऊनच भाजपला त्यांना तिकीट द्यावं लागेल."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com