Nawab Malik : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीत… अजितदादांच ठरलं भाजपच ऐकायचं नाही

Nawab Malik : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीत… अजितदादांच ठरलं भाजपच ऐकायचं नाही

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला गती दिली असून स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर करण्याचा धडाका सुरू आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला गती दिली असून स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर करण्याचा धडाका सुरू आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत मोठा राजकीय संदेश दिला आहे. या यादीत भाजपकडून तीव्र विरोध असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांचा समावेश करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही यादी जाहीर केली असून, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि माजी मंत्र्यांचा समावेश आहे.

छगन भुजबळ यांचे नाव वगळले; समीर भुजबळांना संधी

या यादीतून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव वगळण्यात आले आहे. याआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही त्यांचा समावेश नव्हता. वैद्यकीय कारणांमुळे ते सध्या सक्रिय प्रचारात सहभागी होऊ शकत नसल्याने त्यांचे नाव यादीत नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या जागी माजी खासदार समीर भुजबळ यांना स्टार प्रचारक म्हणून संधी देण्यात आली आहे.

एकाच घरातील तिघे स्टार प्रचारक

या यादीत एकाच घरातील तिघांचा समावेश झाल्यानेही चर्चा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे हे तिघेही स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

नवाब मलिकांवर अजित पवारांचा ठाम विश्वास

मुंबईतील प्रचाराची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडे देण्यावर भाजपने उघड नाराजी व्यक्त केली होती. भाजप नेते आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, नवाब मलिकांना मुंबईची जबाबदारी दिल्यास भाजप-राष्ट्रवादी युती होणार नाही. मात्र, अजित पवार यांनी भाजपचा विरोध डावलत नवाब मलिकांना स्टार प्रचारक बनवले, एवढेच नव्हे तर मुंबईची जबाबदारीही दिली. राजकीय जाणकारांच्या मते, नवाब मलिकांच्या माध्यमातून मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचे गणित अजित पवारांनी मांडले आहे. मात्र, यामुळे मुंबईत भाजप-राष्ट्रवादी युतीवर परिणाम होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे पडसाद राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही उमटू शकतात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख स्टार प्रचारक

या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते नवाब मलिक, आमदार अमोल मिटकरी, सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार झिशान सिद्दीकी, अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली ही स्टार प्रचारकांची यादी केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता राज्यातील युती आणि आघाडीच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांच्या समावेशामुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com