Ajit Pawar : 'माझं ठरलं होतं...घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही'; अजित पवारांनी लग्नाचा 'तो' किस्सा सांगताच एकच हशा पिकला
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्र्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आपल्या मिश्किल भाषणांमुळे नेहमीच ओळखले जातात. त्यांच्या भाषणांमधून अनेक किस्से आणि शब्दप्रयोग हे उपस्थितांमध्ये हशा पिकवतात. असाच एक मजेदार किस्सा त्यांनी एका कार्यक्रमात सांगितला आणि उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त सारथी संस्थेमार्फत आयोजित UPSC व MPSC मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी अजित पवारांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी त्याच्या लग्नासंबंधीत मजेशीर किस्सा सांगितला. ते म्हणाले की, माझं ठरलं होतं की, घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी तरी?, तेव्हा या निंबाळकरसाहेबांनी मला मदत केली आणि मला 1000 पोती सिमेंट दिलं. तेव्हा माझं घर बांधून झालं आणि मग मी लग्न केलं.
अजित पवार म्हणाले की, 80 च्या दशकात सिमेंटची मोठी टंचाई होती. या निंबाळकर साहेबांकडे सिमेंटचे परवाने द्यायची जबाबदारी होती. त्यावेळी यांच्याकडे गेलो असता त्यांना काटेवाडीत घर बांधत असल्याचे मी सांगितले. माझं ठरलं होतं की, घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. तेव्हा त्यांनी मला मदत केली. 1000 पोती सिमेंट दिलं आणि माझं घर बांधून झालं, असा सुनेत्रा पवार यांच्यासोबत लग्न करण्याच्या आधी घर बांधण्याचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.