Sharad Pawar On Pm Narendra Modi
Sharad Pawar On Pm Narendra Modi

"नेत्यांना तुरुंगात टाकण्याची दडपशाही सुरु आहे", शरद पवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

"देशात बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार सुरु आहे. सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे"
Published by :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी इंदापूरच्या सभेत महायुती सरकारवर सडकून टीका केली. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलीय. यावर बोलताना शरद पवार यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं. देशात बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार सुरु आहे. सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे. अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना शेकऱ्यांची बाजू मांडली, त्यांना तुरुंगात टाकलं. आता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं. जनतेसाठी त्यांनी आदर्श शाळा काढल्या आणि आज तेच केजरीवाल तुरुंगात आहेत. नेत्यांना तुरुंगात टाकून एकप्रकारची दडपशाही सुरु आहे, असं म्हणत शरद पवार यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. ते महाविकास आघाडीच्या इंदापूर येथील सभेत बोलत होते.

शरद पवार इंदापूरच्या सभेत पुढे म्हणाले, आज देशाचा, राज्याचा कारभार कुणाच्या हातात असावा, असा प्रश्न आपल्यासमोर आहे. भाजपच्या हातात देशाची सत्ता आहे. लोकशाहीत सत्ता मिळणं आणि ती सत्ता लोकांसाठी वापरणं यात गैर नाही. पण सत्तेचा गैरवापर करणं चुकीचं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या आधारानं मुलभूत अधिकार दिला. त्या संविधानावर सामान्य माणसाने अत्यंत जाणीपूर्वक राहण्याची आवश्यकता आहे. सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी व्हायला पाहिजे. ही निवणडूक अत्यंत महत्त्वाची आहे.

सत्ता कधीही डोक्यात जाऊ देऊ नये. या भागात बागायत शेतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढत आहे. मोदींनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, असं आश्वासन दिलं होतं. पण काही झालं का? कांदा हा जिरायत शेतकऱ्याचं पीक आहे. शेतकऱ्याचा संसार टीकवायचा असेल तर शेतीच्या भावाची किंमत त्याला द्यावी लागेल. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्याची पर्वा नाही, असंही पवार म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत बोलताना पवार म्हणाले, आम आदमी पक्षाने मागील निडणुकीत ८० पैकी ७८ जागा जिंकल्या. ९८ टक्के मतं त्यांच्या पक्षाला मिळाले. असा नेता आज तुरुंगात आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून आता पर्याय आहे. देशातील दडपशाही बदलण्याची गरज आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन करतात. थंडी, उन्हाचा विचार न करता एक हजार शेतकरी वर्षभरापासून आंदोलन करत आहेत.

निवडणुका जवळ आल्या आहेत. सर्वांनी एकत्रित येऊन भाजप सरकारचा पराभव केला पाहिजे. सुप्रिया सुळे यांना देशाच्या पार्लमेंटमध्ये तीनवेळा संधी दिली. तुतारीचा विचार करा आणि काम करणाऱ्या नेत्यांना निवडून द्या, असं आवाहनही शरद पवारांनी केलं आहे. निवडणूक लढता येत नाही, म्हणून काँग्रेसची खाती गोठवली जात आहेत, असंही शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com