Suraj Chavhan : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा राजीनामा; पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून निर्णय
लातूरमधील पत्रकार परिषदेदरम्यान घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपला राजीनामा दिला आहे. काही वेळा पूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर लगेचच त्यांनी राजीनामा देऊन पक्षाच्या आदेशाचा पालन केले आहे. राजीनामा देताना त्यांनी आपल्या निवेदनातून घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली असून, या प्रकारामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्यांचा वारसा लाभलेला आहे. आमचे नेते अजितदादा पवार हाच आदर्श मानून कार्य करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नेहमीच शिस्त आणि सुसंस्कृतीचा आदर केला आहे. मात्र अलीकडच्या काळात आमच्या नेत्यांवर अत्यंत हीन पातळीवर टीका केली जात आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.”
ते पुढे म्हणाले, “छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे, त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा पत्त्याची पाने फेकणे हे त्यांच्या अभिनव आंदोलनाचे रूप असू शकते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या नेत्यांबद्दल अश्लील भाषेत टीका झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी संतापाने प्रतिक्रिया दिली. ती प्रतिक्रिया टाळता आली असती, याची जाणीव असूनही ती घटना घडली. त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.”
पक्षाच्या मूल्यांना प्राधान्य
राजीनाम्याच्या माध्यमातून सूरज चव्हाण यांनी पक्षाच्या मूल्यांना प्राधान्य देत नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिस्त आणि जबाबदारीचे उदाहरण घालून दिले गेले आहे.