Nepal : नेपाळमध्ये युट्यूब, फेसबूकसह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी
(Nepal) जगभरात अब्जावधी लोक वापरत असलेले फेसबुक, एक्स आणि युट्यूबसह तब्बल 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली आहे. कारण या कंपन्यांनी नेपाळ सरकारच्या नोंदणीसंबंधीच्या नियमांचे पालन करण्यास नकार दिला. नेपाळचे दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी स्पष्ट केले की, सरकारने या कंपन्यांना वारंवार नोटिसा पाठवल्या, पण त्याकडे दुर्लक्ष झाले. “देशात अधिकृत नोंदणीशिवाय काम करणे मान्य नाही. त्यामुळे आता तातडीने हे प्लॅटफॉर्म्स ब्लॉक केले जातील."
सरकारने याआधीच कंपन्यांना 28 ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. मात्र, ती मुदत संपल्यानंतर कठोर पाऊल उचलण्यात आले. टिकटॉक, व्हायबर आणि इतर काही प्लॅटफॉर्म्सना सध्या सूट देण्यात आली आहे. कारण त्यांनी आवश्यक नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र, या कंपन्यांनाही सरकारने नेपाळमध्ये संपर्क कार्यालय स्थापन करण्याचे बंधन घातले आहे.
सोशल मीडियाचे नियमन करण्यासाठी नेपाळ सरकारने संसदेत विधेयकही सादर केले आहे. यामध्ये प्लॅटफॉर्म्सवर अधिक जबाबदारी व नियंत्रण आणण्याची तरतूद आहे. या निर्णयामुळे शिक्षण, व्यापार, संवाद आणि मनोरंजन या सर्वच क्षेत्रांवर त्याचा परिणाम होणार आहे. दुसरीकडे सरकारचा दावा आहे की, “डिजिटल प्लॅटफॉर्म्सचे योग्य व्यवस्थापन आणि जबाबदारीसाठीच हा निर्णय आवश्यक आहे.”