Mumbai BEST Bus : नवीन बस मुंबईकरांच्या सेवेत! 21 मार्गांवर धावणार 150 बेस्ट बस

Mumbai BEST Bus : नवीन बस मुंबईकरांच्या सेवेत! 21 मार्गांवर धावणार 150 बेस्ट बस

पर्यावरणपूरक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल टाकत मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Published by :
Prachi Nate
Published on

राज्यातील सार्वजनिक परिवहन प्रणाली अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून एसटी आणि बेस्टच्या ताफ्याचा विस्तार सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या 150 नव्या इलेक्ट्रिक बसगाड्या आज प्रवासी सेवेत दाखल झाल्या. या बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. मुंबईतील 21 मार्गांवर या बस धावतील आणि दररोज सुमारे 1.9 लाख प्रवाशांना त्याचा लाभ होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मुंबईकरांना सोयीची, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वाहतूक सुविधा देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने 5000 नवीन बस सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी आहे आणि तिचे आधुनिकीकरण सातत्याने केले जाईल.”

बसगाड्यांची वैशिष्ट्ये आणि सेवा

या 150 इलेक्ट्रिक बस ‘वेट लीज’ पद्धतीने चालविल्या जाणार आहेत. त्यापैकी 115 बस PMI इलेक्ट्रो मोबिलिटी या कंपनीकडून पुरवल्या असून त्या मुंबादेवी मोबिलिटी प्रा. लि. मार्फत संचलित केल्या जातील. तर 35 बस ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि. यांच्या उत्पादनातून असून ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि. यांच्या मार्फत चालवल्या जातील.

या बसगाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी रॅम्प सुविधा, उत्कृष्ट आसनव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या प्रगत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बसची नियमित तपासणी गुणवत्ता नियंत्रण केंद्रांमार्फत केली जाणार आहे.

या बसेस अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला, बांद्रा, कांदिवली आणि बोरिवली या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांना तसेच मेट्रो लाईन क्रमांक 1, 2A, 7 आणि 3 शी जोडणार आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यापर्यंतची (Last-Mile Connectivity) सुलभता वाढणार आहे.

पर्यावरणपूरक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल टाकत मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com