GST : आजपासून देशभरात नवीन GST दर लागू; काय स्वस्त, काय महाग?
थोडक्यात
आजपासून देशभरात नवीन GST दर लागू
जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त
नवरात्रीत देशातील नागरिकांना अनोखं गिफ्ट
(GST) आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2025 पासून जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानुसार दरकपात लागू झाली आहे. यामुळे तब्बल 375 वस्तू स्वस्त झाल्या असून त्याचा थेट फायदा सामान्य ग्राहकांना मिळणार आहे. दूध, बिस्किटे, धान्य, लोणी, आइस्क्रीम, फळांचे रस, तूप, पनीर, सुका मेवा, तसेच दैनंदिन वापरातील साबण, शॅम्पू, फेस क्रीम, टूथब्रश यांसारख्या वस्तूंवर करकपात झाल्याने दरात घट होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी सुधारणा ‘दिवाळी गिफ्ट’ म्हणून संबोधली. यामध्ये आतापर्यंत असलेले चार करस्लॅब (5%, 12%, 18% आणि 28%) कमी करून दोनच दर (5% आणि 18%) लागू करण्यात आले आहेत. याशिवाय काही विशिष्ट आणि सिन गुड्ससाठी 40% चा दर ठेवण्यात आला आहे. सीतारामन यांच्या मते, या सुधारणा केवळ कररचनेतील कपातीसाठी नसून, व्यवसायांना अधिक सोयीस्कर पद्धतीने कर भरण्याची मुभा देण्यासाठी आणि ग्राहकांना थेट फायदा देण्यासाठी आहेत.
दरकपातीमुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र आणि वाहन उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. AC, वॉशिंग मशीन, TV, डिशवॉशर यांच्या किंमती कमी होणार आहेत. वाहनांवरचा एकूण कर 35–50% वरून थेट 40% पर्यंत आणण्यात आल्याने कार, बाईक आणि इतर गाड्यांच्या किंमतीत घट होईल. सिमेंटवरील कर 28% वरून 18% केला गेल्याने घरबांधणी खर्च कमी होण्याची शक्यता आहे.
याशिवाय औषधे आणि वैद्यकीय उपकरणे हेदेखील स्वस्त होणार आहेत. डायग्नॉस्टिक किट्स, ग्लुकोमीटर यांवरील जीएसटी फक्त 5% करण्यात आला आहे. यामुळे औषधांच्या किमती कमी करण्याचे निर्देश औषध दुकानदारांना देण्यात आले आहेत. तसेच ब्युटी सलून, न्हावी, फिटनेस सेंटर आणि योगा सेवांवरील जीएसटी कमी झाल्याने या सेवाही स्वस्त मिळतील.
दरकपात जाहीर झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांच्या वस्तूंच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. रेल्वे बोर्डानेदेखील पाण्याच्या बाटल्यांचे दर कमी केले आहेत. रेल नीरची 1 लिटर बाटली आता Rs.15 ऐवजी Rs.14 तर 500 ML बाटली Rs.10 ऐवजी Rs.9 ला मिळेल. हे दर आजपासून संपूर्ण देशभर लागू झाले आहेत.