निरंकारी मिशनतर्फे "स्वच्छ जल, स्वच्छ मन" अभियानांतर्गत कळंब समुद्र किनाऱ्याची स्वच्छता

निरंकारी मिशनतर्फे "स्वच्छ जल, स्वच्छ मन" अभियानांतर्गत कळंब समुद्र किनाऱ्याची स्वच्छता

संत निरंकारी मिशनच्या सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पवित्र आशीर्वादाने रविवारी नालासोपारा निर्मळ येथील कळंब समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

वसई - विरार : संत निरंकारी मिशनच्या सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पवित्र आशीर्वादाने रविवारी नालासोपारा निर्मळ येथील कळंब समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. "स्वच्छ जल - स्वच्छ मन" अभियानांतर्गत ही मोहीम राबवण्यात आली होती. या स्वच्छ्ता अभियानात निरंकारी मिशनच्या अनुयायांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

संत निरंकारी मिशनच्या सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पवित्र आशीर्वादाने आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत अमृत प्रोजेक्ट योजनेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत "स्वच्छ जल, स्वच्छ मन" ही मोहीम राबवण्यात आली.

बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी दिलेल्या शिकवणीतून प्रेरणा घेण्यासाठी रविवारी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण देशभरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये हे अभियान 27 राज्य, 700 हून अधिक शहरे आणि 1100 हून अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

या मोहिमेंतर्गत निरंकारी मिशनतर्फे मुंबईला लागून असलेल्या वसई- विरार येथील कळंब समुद्रकिनारी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कळंब समुद्र किनारी साठलेला पर्यावरण घातक कचरा एकत्र जमा करण्यात आला. हा कचरा नंतर सफाई कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केला. दरम्यान या अभियानात ३०० हून अधिक निरंकारी सेवादल आणि अनुयायांनी सहभाग घेतला होता.

निरंकारी मिशनच्या या सफाई अभियानाचे कौतुक कळंब ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच अमिता म्हात्रे यांनी केले. याप्रसंगी कळंब ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच अमिता म्हात्रे, नालासोपारा सत्संगचे मुखी मेवालाल गुप्ता, संचालक आनंद ढसाळ व इतर सेवादल आणि अनुयायी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com