Nitesh Rane : नितेश राणेंच 'आय लव्ह महादेव' पोस्टवर भाष्य; म्हणाले की,....
Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमासाठी एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नितेश राणे यांनी जिल्ह्याच्या प्रगतीबद्दल बोलताना सांगितले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलं काम आणि प्रगती दिसली पाहिजे. यासाठी आढावा बैठक घेतली होती. सर्व विभाग प्रमुख चांगलं काम करत आहेत आणि प्रगतीही होत आहे. काही त्रुटी असल्या तरी अजून सहा दिवस बाकी आहेत, त्यामुळे सतत आढावा घेऊन योग्य निर्णय घेतले जातील. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना जिल्हा पातळीवर जे अपेक्षित आहे, ते आम्ही सिंधुदुर्गमध्ये निश्चितपणे पूर्ण करू. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्यरत आहोत.”
'आय लव्ह महादेव' पोस्टवर नितेश राणे यांचे प्रतिक्रिया
नितेश राणे यांनी 'आय लव्ह महादेव' अशी पोस्ट सोशल मीडियावर केली होती, त्यावर ते म्हणाले, "हे महादेवांचे भूमी आहे. आपल्या प्रत्येकाच्या श्वासात महादेव आहेत. हिंदू राष्ट्रात 'आय लव्ह महादेव' लिहिणं हे योग्य आहे. मी पाकिस्तान किंवा इस्लामाबादमध्ये बसून हे लिहिलेलं नाही. मी भारतात, हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित महाराष्ट्रात हे लिहिलं आहे. यात काही चुकीचं नाही."
केंद्राकडे राज्य हक्काने जाऊ शकते
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत आणि ओल्या दुष्काळासंबंधी पत्रकारांच्या प्रश्नांवर नितेश राणे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दोन दिवस विविध भागांचा दौरा केला आणि प्रत्येक भागाची अडचण समजून घेतली. काही निकषांचा आणि निधी संबंधित मुद्दे असतात. आम्ही 'डबल इंजिन सरकार' म्हणतो, याचा फायदा राज्याला होतो. केंद्र आणि राज्यात एकच विचारधारा असते, म्हणून राज्य हक्काने केंद्राकडे जातं. आतापर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीही उपेक्षित केलेलं नाही. यापुढेही संकटाच्या काळात मोदी साहेब भरपूर मदत करतील, यावर विश्वास आहे."
संकट काळात मदतीचा अधिकार
राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर जाण्याच्या संदर्भात नितेश राणे म्हणाले, "प्रत्येकाला संकटकाळात जनतेसाठी उभं राहण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राच्या त्या भागात संकट आहे, त्यामुळे जेवढी मदत होऊ शकते, तेवढी केली पाहिजे."