Nitesh Rane On Manoj Jarange Statment : मनोज जरांगेंच्या 'त्या' विधानावर नितेश राणेंचं मौन; राजकीय वर्तुळात चर्चा
सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत असतानाच, राजकीय वर्तुळात त्यांच्या आणि नितेश राणे यांच्यातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाची शहरभर तीव्र दखल घेतली गेली. त्यांच्या आठ प्रमुख मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर, उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांनी आंदोलन मागे घेतलं. दरम्यान, मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती आणि न्यायालयाने या आंदोलनाला बेकायदेशीर ठरवले होते.
या आंदोलनादरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री नितेश राणे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी नितेश राणे यांचा उल्लेख "चिंचुद्री" असा करत, एकदा आंदोलन संपलं की त्यांना 'बघतोच' असा इशाराही दिला होता. त्यामुळे नितेश राणे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
नितेश राणेंकडून आंदोलनावर प्रतिक्रिया, फडणवीसांचे कौतुक
आंदोलन संपल्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, "हैदराबाद गॅझेटच्या आधारावर आमच्या सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाने आजवर गुलाल फडवले ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच, त्यामुळे प्रत्येक मराठा बांधवाने त्यांचे आभार मानले पाहिजेत."
‘चिंचुद्री’ विधानावर मात्र नितेश राणे शांत
माध्यमांनी विचारलं असतानाही, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 'चिंचुद्री' या वादग्रस्त उल्लेखावर नितेश राणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी या विषयावर मौन बाळगणंच पसंत केलं.
सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत असतानाच, राजकीय वर्तुळात त्यांच्या आणि नितेश राणे यांच्यातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.