Chief Minister Misbehavior
Chief Minister MisbehaviorChief Minister Misbehavior

Chief Minister Misbehavior : 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम महिलेसोबत असं काहीतरी केलं...; देशभरात संताप; Video Viral

सोशल मीडियावर सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, या व्हिडीओमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Chief Minister Misbehavior ) सोशल मीडियावर सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, या व्हिडीओमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार सार्वजनिक कार्यक्रमात एका मुस्लीम महिला डॉक्टरचा बुरखा ओढताना दिसत आहेत. या घटनेनंतर त्यांच्या वर्तनावर विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली असून काँग्रेसपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पर्यंत अनेक नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

ही घटना 15 डिसेंबर रोजीची असून, त्या दिवशी बिहारमध्ये आयुष विभागातील डॉक्टरांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येत होते. याच कार्यक्रमादरम्यान नुसरत नावाच्या एका महिला डॉक्टरशी संवाद साधताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अचानक तिचा बुरखा ओढल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. हा प्रकार सर्वांसमोर घडल्याने उपस्थितांनाही क्षणभर धक्का बसल्याचे पाहायला मिळते. या घटनेचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली.

या घटनेवर काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, नितीश कुमार आणि भाजपला या प्रकाराबद्दल लाज वाटली पाहिजे. मानसिकदृष्ट्या स्थिर असलेला कोणताही व्यक्ती एखाद्या महिलेचा पदर किंवा बुरखा ओढण्याचे धाडस करणार नाही. हा महिलांचा अपमान असून अस्वीकार्य आहे. काँग्रेस प्रवक्ते उदित राज यांनीही नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत ते मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे म्हटले असून, यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारचे वर्तन केल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) खासदारांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर मन सुन्न झाल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याचेही व्हिडीओत दिसते, मात्र तरीही हा प्रकार घडल्याचे त्यांनी नमूद केले. हा व्हिडीओ समाजासाठी चुकीचा संदेश देणारा असून गंभीर चिंतेचा विषय असल्याचे RJD नेते म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी हा प्रकार पूर्णपणे लज्जास्पद असून तो थेट छळाच्या स्वरूपाचा असल्याचे म्हटले. मुख्यमंत्र्यांना कोणाचाही बुरखा ओढण्याचा अधिकार नसून त्यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनीदेखील नितीश कुमार मानसिकदृष्ट्या कमकुवत झाल्याचा आरोप करत त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे म्हटले. हा प्रकार बिहारसाठी दुर्दैवी असल्याचे सांगत, यापूर्वीही नितीश कुमार यांनी असे वर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वर्तनावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. महिलांच्या सन्मानाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या प्रकरणावर नितीश कुमार काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

  • सोशल मीडियावर सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

  • या व्हिडीओमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

  • या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार सार्वजनिक कार्यक्रमात एका मुस्लीम महिला डॉक्टरचा बुरखा ओढताना दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com