Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात बनावट साधूंना नो एन्ट्री! साधूंना मिळणार ID कार्ड

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात बनावट साधूंना नो एन्ट्री! साधूंना मिळणार ID कार्ड

आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर साधू-संत परंपरेच्या शुद्धतेसाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर साधू-संत परंपरेच्या शुद्धतेसाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशातील १३ प्रमुख आखाड्यांनी एकत्र येत बनावट साधू, महंत आणि संतांना कुंभमेळ्यात प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता प्रत्येक साधू-संन्याशाला अधिकृत ओळखपत्र (Identity Card) बंधनकारक असणार आहे. अलीकडच्या काळात देशभरात भगवी वस्त्रे परिधान करून साधू असल्याचा बनाव करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. अशा बनावट साधूंमुळे भाविकांची फसवणूक होत असून, प्राचीन संत परंपरेची बदनामी होत आहे. याच पार्श्वभूमीवर १३ आखाड्यांच्या महासभेत हा महत्त्वाचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

या निर्णयानुसार, १३ आखाड्यांशी संलग्न असलेल्या सर्व साधू-संन्याशांना स्वतंत्र ओळखपत्र जारी केले जाणार आहे. या ओळखपत्रामध्ये संबंधित साधूचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच आखाड्यातील पद व जबाबदारीचा तपशील नमूद करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, या ओळखपत्रावर गोपनीय बारकोड असणार असून, त्याची माहिती फक्त संबंधित आखाड्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच उपलब्ध राहणार आहे.

ही ओळखपत्रे संबंधित आखाड्याचे महासचिव किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनेच जारी केली जातील. त्यामुळे कुठलाही बाहेरील किंवा बनावट व्यक्ती साधू-संत असल्याचा दावा करून कुंभमेळ्यात सहभागी होऊ शकणार नाही. कुंभमेळ्याच्या काळात प्रशासन, आखाडे आणि सुरक्षा यंत्रणांना या ओळखपत्रांच्या आधारे साधूंची खातरजमा करणे सुलभ होणार आहे.विशेष म्हणजे, या निर्णयामुळे साधू-संतांचा एक नवीन ‘कॉर्पोरेट लूक’ पाहायला मिळणार असून, पारंपरिक साधू परंपरेला आधुनिक व्यवस्थापनाची जोड दिली जाणार आहे. हा बदल २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक महाकुंभमेळ्यात प्रत्यक्षात दिसून येईल.

अखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, हा निर्णय कोणालाही वगळण्यासाठी नसून, खऱ्या संन्याशांचे संरक्षण आणि संत परंपरेची विश्वासार्हता जपण्यासाठी आहे. भाविकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी आणि अध्यात्मिक वातावरण शुद्ध राखण्यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक होता. या निर्णयामुळे कुंभमेळ्यातील शिस्त, सुरक्षितता आणि पारदर्शकता वाढणार असून, खरा साधू आणि बनावट साधू यातील फरक स्पष्टपणे ओळखता येणार आहे. त्यामुळे नाशिक कुंभमेळा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि श्रद्धेचा महोत्सव ठरणार, असा विश्वास आखाड्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com