Sharad Pawar : 'सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहितीच नाही', शरद पवारांची गुगली

Sharad Pawar : 'सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहितीच नाही', शरद पवारांची गुगली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असतानाच, त्यांच्या जागी कोण नेतृत्व करणार यावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने होत होती. अखेर आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार असून, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता राजभवनात सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे. मात्र, या साऱ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे, या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आज शपथविधी आहे, हे देखील मला माध्यमांमधूनच कळले.” शरद पवार यांनी पुढे स्पष्ट केले की, हा निर्णय संबंधित पक्षाचा आहे आणि त्यावर भाष्य करण्याचा अधिकार त्या पक्षातील नेत्यांनाच आहे.

“पटेल, भुजबळ, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्यास, तो त्यांचा अधिकार आहे. NCP ने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील,” असेही शरद पवार म्हणाले. विलिनीकरणाबाबत याआधी सकारात्मक चर्चा सुरू होती, मात्र आता त्या प्रक्रियेला खंड पडल्याचे संकेतही त्यांनी दिले.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच सुनेत्रा पवार या पुत्र पार्थ पवार यांच्यासोबत रात्री उशिरा मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या. पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा असून, यासाठी भाजपाकडूनही सकारात्मक प्रतिसाद असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा न करता हे निर्णय घेतले गेल्याने, पवार कुटुंबातील अंतर्गत समीकरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील राजकीय दिशा याबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. येत्या काही तासांत राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com