Sanjay Raut : ‘आता तरी मोदींनी घराणेशाहीवर बोलू नये’ संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : ‘आता तरी मोदींनी घराणेशाहीवर बोलू नये’ संजय राऊतांचा घणाघात

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वबदल होत असतानाच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वबदल होत असतानाच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केल्यावरून संजय राऊतांनी थेट भाजपवर आणि पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “मी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. त्यांनी महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, मोदी सातत्याने ठाकरे आणि गांधी घराण्यावर घराणेशाहीचा आरोप करत आले आहेत. आज सुनेत्रा पवारांचे अभिनंदन करून त्यांनी स्वतःलाच त्या आरोपातून मुक्त केले आहे. त्यामुळे यापुढे तरी त्यांनी घराणेशाहीवर बोलू नये,” असा टोला राऊत यांनी लगावला.

यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावरही भाष्य केले. सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्री होणे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “हा अजित पवारांचा पक्ष आहे, त्यांचे आमदार आहेत. तटकरे, पटेल यांच्यासह पक्षातील वरिष्ठांनी हा निर्णय घेतला असेल. मात्र अजित पवारांचा पक्ष हा कष्टकरी, ग्रामीण आणि रांगड्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,” असे राऊत म्हणाले.

अजित पवार आणि शरद पवार यांनी कधीही महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड केली नाही, असे सांगत संजय राऊत यांनी पुढे चिंता व्यक्त केली. “हा पक्ष प्रफुल्ल पटेलांच्या प्रभावाखाली जाऊ नये. हा पक्ष भोसले, पाटील, मोहिते, कांबळे यांचा आहे. तो पटेलांचा होऊ नये, याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. पक्षाची सूत्रे मराठी चेहऱ्यांकडेच राहायला हवीत, अन्यथा महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

भाजपवर थेट आरोप

भाजपवर जोरदार हल्ला चढवताना संजय राऊत म्हणाले की, भाजप आता स्वतःच्या बळावर राजकारण करू शकत नाही. “भाजपची छाती आणि खांदे आता पिचले आहेत. त्यामुळेच ते दुसऱ्यांचे खांदे वापरून महाराष्ट्रातील निष्ठावान व्यक्ती, संस्था आणि पक्षांचा काटा काढत आहेत. ही भाजपची रणनीती महाराष्ट्राला मान्य नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वबदल, भाजपची भूमिका आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा यामुळे राज्यातील राजकारण आगामी काळात अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com