Zero Balance असेल तर आता नो टेंशन ; 'या' बँकांनी बदलले नियम
प्रत्येक बँकांची स्वतःची अशी एक नियमावली असते. त्यानुसार प्रत्येक बँका आपले दैनंदिन व्यवहार चालू ठेवत असतात. आता बँकेमध्ये बचत खाते असलेल्या लोकांना एका नियमापासून सुट्टी मिळणार आहे. भारतातील पाच मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आता सेव्हींग अकाऊंटवर किमान बॅलन्स मेंटनेसची अट काढून टाकली आहे. त्यामुळे आता या पाच बँकेच्या खातेधारकांना बचत खात्यात किमान शिल्लक पैसे ठेवण्याची चिंता करावी लागणार नाही.
देशातील बँका ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध सुविधांचा अवलंब करत असतात.जवळजवळ सर्वच बँका आपल्या बँकेतील खातेधारकांना आपल्या खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स मेंटेन ठेवण्यासाठी सांगत असतात. जर हा किमान बॅलन्स ठेवला गेला नाही तर बँकांकडून प्रत्येक महिन्याला दंड आकारले जाते. मात्र आता पाच मोठ्या बँकांनी किमान बॅलन्सवर जे शुल्क आकारले जाते ते पूर्णपणे रद्द केले आहे. म्हणजे बँकेच्या खातेधारकांचे बचत खाते रिकामी राहिले तरी त्या ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
इंडियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक,बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक या पाच बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज पूर्णपणे बंद केला आहे.यामध्ये कॅनरा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मे महिन्यातच हा नियम रद्द केला होता. तर इतर चार बँकांनी जुलै महिन्यापासून हा नियम रद्द केला आहे. यामुळे आता या पाच बँकांच्या खातेधारकांच्या खात्यामध्ये जर काहीही रक्कम शिल्लक नसली तरीही त्यांना कोणत्याही प्रकारचे दंड भरावे लागणार नाही.