Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

दसरा मेळाव्यात (Ramdas Kadam)शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांची राजकीय किंमत आता शिंदे गटाला चुकवावी लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वादग्रस्त वक्तव्य

  • रामदास कदमांनी का केली सारवासारव?

  • बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत, असं कदम यांनी म्हटलं.

दसरा मेळाव्यात (Ramdas Kadam)शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांची राजकीय किंमत आता शिंदे गटाला चुकवावी लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव मातोश्रीमध्ये दोन दिवस ठेवलं गेलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता. मात्र, या वक्तव्यामुळेच शिवसेना शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या वादळानंतर रामदास कदम यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आपली स्पष्ट केली. बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत, असं त्यांनी म्हटलं. तसंच, दिवाळी होती, लोकांच्या घरातील कंदील विझता कामा नये. लोकांची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून मी दोन दिवस पार्थिव ठेवले, असं उद्धव ठाकरेंनी सांगावं. माझं काहीच म्हणणं नाही. हे जे तुम्ही आज सांगत आहात तेच महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे यांनी एकदा सांगावं. हेच माझं म्हणणं आहे. लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही दोन दिवस काढले असं त्यांनी सांगावं, असं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव दोन दिवस खोलीत का ठेवलं? हा संशय मी व्यक्त केला आहे. त्यात गैर काय? माझी मागणी योग्य असेल तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील होते. अनिल परब माहिती देत आहेत. पण उद्धव ठाकरे का गप्प आहेत? मी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं की, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा, ते आमचं दैवत आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मला त्यांनीच सांगितलं की मी त्यांच्या हातांचे ठसे घेऊन ठेवले आहेत, असे देखील रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.

एकनाथ शिंदे यांच्यापासून ते गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर आणि अर्जुन खोतकर या सर्वच नेत्यांच्या नैतिकतेवर कदम यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे. या सर्व नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मंत्रीपद भूषवले. मग जर त्यांची निष्ठा खरोखरच बाळासाहेबांच्या विचारांशी होती, तर त्यांनी तो कथित प्रकार का सहन केला? आणि तो पाहून ते गप्प का राहिले? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. रामदास कदम यांनी जणू उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या आरोपांचं टायमिंग पूर्णपणे चुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com