Devendra Fadanvis On Municipal Elections : "मागच्यावर्षी सत्तेची हंडी फोडली, यावर्षी मुंबईसह..." दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांनी फुकंले मनपा निवडणुकांसाठी रणशिंग

Devendra Fadanvis On Municipal Elections : "मागच्यावर्षी सत्तेची हंडी फोडली, यावर्षी मुंबईसह..." दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांनी फुकंले मनपा निवडणुकांसाठी रणशिंग

मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबई-ठाण्यात साजऱ्या झालेल्या दहीहंडी उत्सवात यंदा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहच नाही, तर राजकीय रंगदेखील ठळकपणे दिसून आला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील टेंभीनाका दहीहंडी उत्सवात थेट निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. “मागील वर्षी आम्ही सत्तेची हंडी फोडली, यावर्षी मुंबईसह सर्व पालिकांची हंडी आम्हीच फोडणार आहोत,” असे वक्तव्य करत त्यांनी विरोधकांवर टिका केली.

फडणवीस यांनी ‘लोणी’ या प्रतीकात्मक भाषेत भ्रष्टाचारावर बोट ठेवले. “पूर्वी हे लोणी काही मोजक्यांच्याच वाट्याला जायचे, आता ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आमचे सरकार करेल,” असे ते म्हणाले. वरळी जांबोरी मैदानावर झालेल्या परिवर्तन दहीहंडीत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणादायी प्रसंगांचे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांचा सन्मान केला. घाटकोपर येथे लष्करी जवानांसमवेत संवाद साधताना फडणवीस यांनी “गोविंदा पथकांचे थर हे सैन्याच्या शौर्यासाठी अर्पण आहेत, एकतेचे प्रतीक आहेत,” असे गौरवोद्गार काढले. विक्रोळी टागोरनगरमध्ये त्यांनी दहीहंडीतील थर समाजाच्या ऐक्याचे प्रतीक असल्याचे नमूद केले.

यंदाही मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे व मुंबईतील विविध उत्सवांना हजेरी लावून जनतेत आपली ताकद दाखवली. फडणवीस यांनी आनंद दिघे यांच्या वारशाचा उल्लेख करत “शिंदे हेच खरे शिवसैनिक आहेत,” असे सांगत महायुतीच्या एकजुटीचा संदेश दिला. दरम्यान, शिंदे यांनीही टेंभीनाका येथील उत्सवात भाषण करत गेल्यावर्षीचा विधानसभेतील यशस्वी अनुभव सांगितला. “तेव्हा आम्ही 232 आमदाररूपी थर लावले. महायुतीने हंडी फोडली,” असे ते म्हणाले.

भाजप व शिंदे गटाच्या विविध कार्यकर्त्यांच्या दहीहंडी उत्सवांना मुख्यमंत्री उपस्थित राहून थेट मतपेरणी केली. कपिल पाटील यांच्या भिवंडीतील कार्यक्रमासही त्यांनी हजेरी लावली. शेवटी, फडणवीस यांनी उत्सवावरील पूर्वीची बंधने हटवल्याची आठवण करून दिली. “पावसापेक्षा मोठा हा गोविंदांचा उत्साह आहे,” असे सांगत त्यांनी जनतेला निवडणुकीच्या तयारीचा अप्रत्यक्ष संदेश दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com