Ganeshotsav 2025 : गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला! राज्यभरात दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन
काल राज्यात मोठ्या थाटामाटात मुंबई तसेच देशभरात गणरायाचे आगमन करण्यात आले. आजपासून गणपती बाप्पाच्या निरोपाला सुरुवात होत आहे. काल आलेल्या गणपती आज जात आहे म्हणून अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रु दिसणार आहेत. सर्वांना सुखी ठेवा आणि पुढच्या वर्षी लवकर या! अशी घोषणा देताना लहानासह मोठ्या व्यक्तींचे डोळे पाणावले असणार आहेत. राज ठाकरे, सचिन अहिर आणि सुनील प्रभू यांच्या घरातील दिड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे.
दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. त्याशिवाय, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्थांनीदेखील कृत्रिम तलावाद्वारे विसर्जनाची तयारी केली आहे. मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.
गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहू समुद्र किनाऱ्यांसह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची तयारी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. त्याशिवाय, विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.