Chitra Kishor Wagh : डब्बेवाल्यांना केवळ आश्वासनं, तर प्रत्यक्ष मदत भाजपकडून; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबईचा अस्सल आणि जगभरात नावाजलेला ‘डब्बेवाला’ हा ब्रँड गेल्या अनेक दशकांपासून शहराची ओळख बनला आहे. मात्र, या डब्बेवाल्यांच्या प्रश्नांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ शब्दांचीच उधळण केली, असा घणाघाती आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. डब्बेवाल्यांच्या नावावर राजकारण झाले, पण त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडवणारे निर्णय मात्र भाजप सरकारनेच घेतल्याचा दावा त्यांनी केला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, “उद्धव ठाकरे यांनी इतकी वर्षे सत्तेत राहूनही मराठमोळ्या डब्बेवाल्यांसाठी नेमकं काय केलं, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. त्यांच्या वाट्याला फक्त पोकळ आश्वासनं आली. त्याउलट, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या या खऱ्या ब्रँडसाठी थेट पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष काम करून दाखवलं.”
डब्बेवाल्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी ‘डब्बेवाला भवन’ येथे आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र उभारण्यात आल्याचंही चित्रा वाघ यांनी अधोरेखित केलं. केवळ इतकंच नाही, तर डब्बेवाल्यांच्या निवासाचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांच्यासाठी घरांची योजना आखण्यात आली असून, एमएडीएमार्फत त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
“मराठी माणूस आणि त्याचा ब्रँड जपायचा असेल, तर केवळ घोषणा नाही तर ठोस निर्णय आवश्यक असतात. हे देवेंद्र फडणवीस यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे,” असं म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टोला लगावला. महायुती सरकारच मराठी माणसाच्या हिताचं सरकार आहे आणि डब्बेवाल्यांच्या प्रश्नांवरही तेच संवेदनशील असल्याचा दावा त्यांनी केला.
या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा डब्बेवाल्यांच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची धार वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. मुंबईच्या या ऐतिहासिक सेवाव्यवस्थेचा सन्मान आणि भवितव्य नेमकं कुणाच्या हातात सुरक्षित आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
