पंढरपूर कॉरिडोर मंदिर परिसर तीन एकर जागेवर प्रस्तावित

पंढरपूर कॉरिडोर मंदिर परिसर तीन एकर जागेवर प्रस्तावित

दोन महिन्यांपासून संशयाच्या भोवाऱ्यात असणाऱ्या पंढरपूर कॉरीडोरचा संभ्रम आज अखेर दूर झालाय.

अभिराज उबाळे, सोलापूर: दोन महिन्यांपासून संशयाच्या भोवाऱ्यात असणाऱ्या पंढरपूर कॉरीडोरचा संभ्रम आज अखेर दूर झालाय. मंदिर परिसरातील रहिवाशांची भीती खरी होताना दिसतेय. पंढरपूर विकास आराखड्यामध्ये पहिल्यांदा मंदिराचा गाभा, मग मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यूपीच्या धरतीवर होणाऱ्या या विकासासाठी मंदिर परिसरातील तब्बल 35 ते 40 गल्लीबोळ आणि रस्ते गरजेनुसार अधिग्रहित करण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

तसेच पंढरपूर कॅरीडोर करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 72 हजार स्क्वेअर फुट तर दुसऱ्या टप्प्यात 39 हजार स्क्वेअर फुट जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. मंदिर परिसरातील जवळपास तीन एकर रहिवासी आणि व्यापारी जागा या प्रस्तावित पंढरपूर कॅरिडॉर मध्ये जाणार आहे.

पंढरपुरात कॅरिडॉर होणार ही चर्चा सुरू झाल्यापासून शहरात भीतीचे वातावरण होते. ही भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी आज अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत व्यापारी, स्थानिक रहिवाशी,वारकरी मंडळी, लोकप्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थानिकांनी आराखडा प्रसिद्ध करण्याची मागणी लावून धरली. या मागणीवरून बैठकीत गोंधळ झाला. अखेर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोमवार पर्यंत विकास आराखडा नागरिकांसाठी खुला ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच या आराखड्यामध्ये बाधित होणाऱ्यांचे सर्वकश पुनर्वसन करण्यात येणार आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com