Pankaja Munde : 'गोपीनाथ मुंडे हयात असते तर, ते...'; गोपीनाथ मुंडेंच्या स्मृति दिनी पंकजा मुंडे भावुक
3 जुन दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृति दिन आहे. यानिमित्त दरवर्षी परळीच्या पांगरी येथील गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा मंत्री पंकजा मुडेंसह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृति दिनी पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. या यासोबतच प्रीतम मुंडे आणि पंकजा यांचा मुलगा देखील मंचावर उपस्थित होता. यावेळी गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या 11व्या स्मृतिदिनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे या बाबांच्या आठवणीत भावूक झाल्याचे दिसून आले. तसेच 11 वर्षांनंतर गोपीनाथ गडावर मुंडे बंधू भगिनी एकत्र आल्याचे यावेळी बघायला मिळाले.
पंकजा मुंडे यांनी भाषणात म्हटले की, आजचा दिवस आमच्यासाठी सर्व काही उध्वस्त करणारा होता. त्यांची मुलगी म्हणून हा कार्यक्रम घेणे माझे कर्तव्य आहे. ‘मी दरवर्षी बाबांच्या आठवणीत रक्तदान शिबीर आयोजित करते आणि मी स्व:ता रक्तदान करते. त्याचबरोबर आज वृक्षारोपण आणि इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून मुंडे साहेबांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.’पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मुंडे साहेबांच्या मनात सामन्य लोकांबाबतची भावना अत्यंत स्वच्छ होती, त्यामुळे त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. त्यामुळे त्यांनी कधीच कुणाविषयी वाईट विचार केला नाही. त्यांनी आणखी खूप काम करायचं होतं.
आज जर मुंडे साहेब असते तर देशातील फार मोठ्या पदावर नक्कीच असते, त्यांच्या सहकार्यांसोबत ते आपल्याला रोज दिसले असते. तुम्ही त्यांना कुठे शोधता हे माहिती नाही, पण मी तुमच्यामध्ये त्यांना शोधते.आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत, गावागावात मुंडे साहेबांची जयंती साजरी होते. हे आमचे भाग्य आहे, आमच्या परिवाराचे भाग्य आहे. मी आज जिजांचा (दिवंगत आमदार आर.टी देशमुख) फोटो गोपीनाथ गडावर लावला आणि मी सुतक देखील पाळले. मला ब्राह्मणांने सांगितले की, जिजासाठी ताई तुम्ही एखादा पदार्थ सोडा बरं का...मी लेक म्हणून इथे तीन दिवस थांबून राहिले.
हे ऋणानुबंध आहेत, इथे ना जात आहे ना धर्म...कठीण यातनेतूनच मोठं होता येतं. रावणाला कुठे वणवास झाला, कुठे कोरवांना वनवास झाला. कुठेही चांगलाच माणसांना त्रास होत असतो, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही यातना भोगायला पण तयार आहोत, जर तुम्ही आमच्यासोबत आहात तर आम्ही यातना भोगायलाही तयार आहोत. यावेळी पंकजा मुंडे कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांचे आभार व्यक्त करताना दिसल्या. लोकांचे प्रेम हेच आमचे वैभव याला कोणाची हि दृष्ट लागू नये अशी अपेक्षा करत सर्व नागरिकांचे पंकजा मुंडे यांनी यावेळी आभार मानले.