Sheetal Devi : जिद्द असेल तर अशक्यही शक्य आहे! शीतल देवीने रचला भारतीय क्रीडा इतिहासातील नवा अध्याय
शरीर अपूर्ण असलं तरी स्वप्नं आणि जिद्द पूर्ण असेल तर काहीही अशक्य नाही. आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रतिभेला शरीराची, मर्यादांची गरज नसते. हे सिद्ध केलं आहे काश्मीरच्या शितल देवीने. जन्मापासून दोन्ही हात नसतानाही या तरुणीने तिरंदाजीच्या जगात असा पराक्रम गाजवला आहे, की आता तिचं नाव भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं आहे.
जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी शितल देवी आता आणखी एका नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. जेद्दाह येथे होणाऱ्या आशिया कप स्टेज-३ साठी तिची निवड भारतीय एबल-बॉडी ज्युनियर संघात झाली आहे. म्हणजेच, ती आता सक्षम खेळाडूंशी खांद्याला खांदा लावून स्पर्धा करणार आहे. हे यश मिळवणारी शितल ही देशातील पहिली पॅरा-आर्चर ठरली आहे.
केवळ हात नसतानाही पायांनी धनुष्य ओढत, लक्ष्यावर अचूक बाण सोडणारी शितल देवी ही जगातील काही मोजक्या तिरंदाजांपैकी एक आहे. तिच्या जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा प्रत्यय जगाला आधीच आला होता, जेव्हा तिने मागच्या वर्षी 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय शोमध्ये स्वतःची कहाणी सांगितली होती. त्यावेळी तिने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते की, "मला एक दिवस सक्षम तिरंदाजांशी स्पर्धा करायची आहे" आणि अवघ्या एका वर्षात तीच गोष्ट वास्तवात आली आहे. हा क्षण भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी खरचं एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
भारतीय संघात निवड झाल्यानंतर शितलने सोशल मीडियावर लिहिले, “जेव्हा मी तिरंदाजी सुरू केली, तेव्हा माझं स्वप्न छोटं होतं. सक्षम तिरंदाजांसमोर उभं राहण्याचं. सुरुवातीला मी वारंवार हरले, पण प्रत्येक पराभवातून शिकले. आज, त्या स्वप्नाच्या एक पाऊल जवळ आले आहे.”
तिच्या या पोस्टनंतर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. क्रीडाप्रेमी, पॅरा-खेळाडू आणि सामान्य नागरिकांनी तिच्या कामगिरीचं कौतुक करत “हीच खरी भारताची प्रेरणा” असं म्हटलं आहे. शितल देवीचे प्रशिक्षण जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे होत असून, तिच्या प्रशिक्षकांनीही तिच्या या कामगिरीला “मानव इच्छाशक्तीचा चमत्कार” असं संबोधलं आहे.
दोन्ही हात नसतानाही शारीरिक मर्यादा कधी अडथळा ठरू दिला नाही. ती पायांच्या सहाय्याने धनुष्य हाताळते, लक्ष्य साधते आणि प्रत्येक बाणासोबत आपल्या स्वप्नांना आकार देते. आज तिचं नाव फक्त क्रीडा विश्वात नव्हे, तर प्रत्येक त्या व्यक्तीच्या मनात घुमतंय ज्याने आयुष्यात संघर्ष पाहिला आहे. शितल देवी ही फक्त एक खेळाडू नाही, तर “अशक्य” या शब्दाचा अर्थ बदलून टाकणारी प्रेरणा आहे.

