Chhattisgarh Bilaspur Train Accident : "डोळे उघडले तेव्हा स्वतःला सीटखाली अडकलेलं पाहिलं अन् समोर मृतदेह" बिलासपूर दुर्घटनेत प्रवाशांचा थरकाप उडवणारा अनुभव
छत्तीसगडमधील बिलासपूर येथे मंगळवारी दुपारी मोठी रेल दुर्घटना घडली. कोरबा- बिलासपूर मार्गावर धावणारी कोरबा पॅसेंजर MEMU ट्रेन लालखदान परिसरात एका मालगाडीला धडकली. या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. धडकेत प्रवासी ट्रेनचे डबे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले.
अपघातानंतरचे व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये ट्रेनचा इंजिन भाग मालगाडीच्या कंटेनरवर चढल्याचे स्पष्ट दिसते. काही डबे रुळांवरून घसरले असून घटनास्थळी तुटलेले लोखंडी साहित्य आणि भगदाड पडलेले कोच दिसून येत आहेत. रेल्वे मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देईल.
यादरम्यान जे प्रवासी सुरक्षितरित्या बचावले गेले त्यांनी बिलासपूर येथील या दुर्घटनेचा भयावह अनुभव सांगितला, जो जाणून घेतल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल. यावेळी त्या ट्रेनमध्ये असलेले पहिल्या डब्यातील प्रवासी संजीव विश्वकर्मा यांनी सांगितले की, "अचानक ट्रेन जोरात धडकली असं वाटल. त्यानंतर सर्वत्र अंधार पडला होता. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतः सीटखाली अडकलो होतो आणि समोर पाहिलं तर मृतदेह पडले होते."
तसेच मोहन शर्मा यांनी सांगितले की, "लिंक एक्सप्रेस उशिरा आल्याने ते लोकल ट्रेनमध्ये चढले होते. धडक इतकी जोरदार होती की त्यांचा पाय अडकला होता." पुढे एकाने सांगितलं की, "अपघातादरम्यान त्यांचा पाय तुटला होता. सर्वत्र गोंधळ उडाला होता आणि लोक ओरडत होते."
तसेच तेथील स्थानिकांनी सांगितलं की, धडकेचा आवाज ऐकताच, जवळच्या गावातील लोक घटनास्थळी धावले आणि बचाव कार्यात मदत केली. या अपघातामुळे सुमारे 12 गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनीही अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी अपघात अत्यंत दुःखद आणि वेदनादायक असल्याचे वर्णन केले.

