Pimpri-Chinchwad : हुंडा प्रथा संपवण्याचा निर्धार,सर्व समाजांचा लग्नातील विकृती विरोधात एकत्रित लढा

Pimpri-Chinchwad : हुंडा प्रथा संपवण्याचा निर्धार,सर्व समाजांचा लग्नातील विकृती विरोधात एकत्रित लढा

पिंपरी चिंचवड: हुंडा प्रथा संपवण्याचा निर्धार, समाजाचा विवाहातील विकृती विरोधात एकत्रित लढा.
Published by :
Riddhi Vanne
Published on

वैष्णवी हगवणे प्रकरणाने केवळ मराठा समाजालाच नव्हे, तर संपूर्ण समाजमनाला हादरवून टाकले आहे. या घटनेनंतर समाजातील वेगवेगळ्या घटकांनी आता विवाहसंस्थेतील अनिष्ट प्रथांविरोधात उघडपणे आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात मराठा, ओबीसी, माळी, बारा बलुतेदार आदी विविध समाजांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक एकत्र आले आणि एका ऐतिहासिक बैठकीत सामूहिक ठराव पारित करत विवाह संस्कृतीत गरज असलेल्या क्रांतीचा आरंभ केला.

समाजसंघटनांची बैठकीत ऐतिहासिक ठराव

या बैठकीत केवळ हुंडा प्रथा नाकारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला नाही, तर विवाहातील अति खर्च, दिखावा आणि सामाजिक दडपणाला तिलांजली देण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला. बैठकीत पुढील कार्ययोजना जाहीर करताना विविध समित्या स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.

"आम्ही गाव पातळीवर समिती नेमणार आहोत. युवक समित्याही स्थापन होणार आहेत. या माध्यमातून आम्ही प्रत्येक तरुणाला व्यवसायाच्या आधारे स्थैर्य मिळवून देणार आहोत," असे या बैठकीत सांगण्यात आले. ‘दहशत वैचारिक असावी’...हुंडा देण्याची ऐपत दाखवणाऱ्यांना इशारा.

या बैठकीत केवळ हुंडा नाकारण्याचा नव्हे, तर हुंडा मागणाऱ्यांवर वैचारिक दहशत निर्माण करण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला.

"हा हुंडा कधीच संपलेला आहे. फक्त तो अजूनही 'कागदावरील' व्यवहारात आहे. हुंडा मागण्याची ऐपत दाखवणाऱ्यांना आता भीती वाटली पाहिजे – ही विचारांची दहशत आम्ही निर्माण करणार आहोत!" ‘कर्ज काढून दिवाळी करू नका’...सत्य स्वीकारण्याचा सल्ला

सामाजिक प्रतिष्ठेसाठी, प्रतिष्ठेच्या झगमगाटासाठी घेतलेली कर्जं, दागदागिने, हॉलचे खर्च आणि हजारो लोकांचे जेवण यासारख्या अनावश्यक खर्चाविरुद्ध या बैठकीत ठाम भूमिका घेण्यात आली. "कर्ज काढून लग्न सोहळे थाटामाटात साजरे करणे ही नवी गुलामी आहे. आपण त्यातून बाहेर यायला हवे," असा स्पष्ट संदेश उपस्थितांनी दिला.

'सहभाग न फक्त मराठा समाजाचा'...ही चळवळ सर्वसमावेशक

या बैठकीत फक्त मराठा नव्हे, तर माळी समाज, ओबीसी, बारा बलुतेदार, भटक्या-विमुक्त, दलित, आदिवासी समाजांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. त्यामुळे ही लढाई एका समाजापुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण समाजासाठीचा एक सामाजिक आंदोलनाचा प्रारंभ झाला आहे. "ही काळाची गरज आहे. लग्नातील स्पर्धा, इर्षा, 'त्यांच्या लग्नाला 5 हजार लोक आले, माझ्या लग्नात 6 हजार पाहुणे हवेत', या वृत्तीला आता आवर घालायला हवा," असं बैठकीत ठामपणे सांगण्यात आलं.

"रेण काढून सन करू नका"... नव्या पिढीच्या पाठीशी सामाजिक पाठबळ

बैठकीत उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आणि मार्गदर्शकांनी भाऊसाहेबांची आठवण करून दिली. "रेण काढून सन करू नका," या विचारांचा पुनरुच्चार करत उपस्थित तरुणांना समाजासाठी विचार करण्याचं आवाहन करण्यात आलं.

पुढचं पाऊल काय?

या बैठकीनंतर समाजात सकारात्मक चळवळ उभी राहण्याची चिन्हं दिसत आहेत. गावागावात समित्या स्थापन करून, युवकांना मार्गदर्शन, कौशल्य विकास, आणि व्यवसाय मार्गदर्शन दिलं जाणार आहे. विवाहसंस्थेतील 'डोळेझाक' न करता, खरं बोलून बदल घडवणं, हा मूळ उद्देश आहे. पिंपरी चिंचवडमधील ही बैठक ही एका नवसंस्कृतीचा आरंभ आहे. जेथे विवाह म्हणजे थाटटमाट नव्हे, तर दोन कुटुंबांचा सन्मानपूर्वक सहजीवनाचा प्रारंभ असेल. समाजाने एकत्र येऊन घेतलेला हा निर्णय पुढील पिढ्यांसाठी एक सशक्त आदर्श बनू शकतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com