Narendra Modi
Narendra Modi

"नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणारच" PM नरेंद्र मोदींचा मोठा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विकसित भारताच्या निर्धार सभेत बोलत होते.
Published by :
Naresh Shende
Published on

Narendra Modi On Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील इंडिया आघाडीचे जे नेते आहेत, त्यांनी सर्व छोट्या मोठ्या पक्षांना सल्ला दिला आहे की, निवडणूक संपल्यावर या पक्षांना काँग्रेसमध्ये विलिन केलं पाहिजे. ही सर्व दुकाने एकत्र आल्यावर काँग्रेस मोठा विरोधी पक्ष होईल, असं त्यांना वाटत आहे. ही नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी आहे. या पक्षांचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणं, पक्क आहे. जेव्हा या नकली पक्षांचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होईल, मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसमध्ये सामील होईल, त्यावेळी मी शिवसेना पक्ष संपलेला असेल, असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. नकली शिवसेनेनं बाळासाहेबांच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर केला आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विकसित भारताच्या निर्धार सभेत बोलत होते.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, अयोध्येत भव्य राम मंदिर उभारावं व्हावं, असं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवलं जावं, असं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण झालं. पण यामुळं सर्वात जास्त चीड नकली शिवसेनेला आली आहे. काँग्रेसने राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारलं. नकली शिवसेनेनंही तोच मार्ग स्वीकारला. काँग्रेसचे लोक मंदिराबाबत अनाठायी गोष्टी बोलत आहेत आणि नकली शिवसेना एकदम गप्प आहे.

त्यांचं पाप महाराष्ट्रासमोर आलं आहे. वीर सावरकरांना काँग्रेस शीवीगाळ करते. महाराष्ट्राची स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्त जनता हे पाहते, तेव्हा महाराष्ट्रातील लोकांचा राग सातव्या आकाशात चढला आहे. पण नकली शिवसेनेला इतका अहंकार आला आहे की, महाराष्ट्राच्या जनेतेचा भावनांचाही ते विचार करत नाही. या निवडणुकीच्या चार टप्प्यात जनतेनं त्यांचा पराभव केला आहे.

मोदी गरिबांना मोफत रेशन देत आहे. मोदी गरिबांना पक्के घर देत आहे. मोदी गरिबांना गॅस कनेक्शन देत आहे. वीजपुरवठा आणि प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचं काम केलं. मी कधाही कुणाची जात-धर्म पाहिली नाही. योजना सर्वांसाठी केली जाते. या योजनांचा सर्वांना लाभ मिळतो. याचा खूप मोठा खुलासा आज मी १४० कोटी नागरिकांसमोर करु इच्छितो. देशातील सरकारे जेव्हढा बजेट काढते, त्याचं १५ टक्के फक्त अल्पसंख्यांकांना मिळतं, असा विचार काँग्रेस करते. धर्माच्या आधारावर काँग्रेसने देशाचं विभाजन केलं. धर्माच्या आधारावर काँग्रेसने अनेक वर्ष राजकारण केलं.

काशीत मी बाबा विश्वनाथ आणि कालभैरवचं आशीर्वाद घेऊन अर्ज भरला. आज मी त्र्यंबकेश्वरच्या भूमित आहे. मी सर्वांना नमन करतो. तुमची सेवा करणं हेच माझ्या जीवनाचं सर्वात मोठं लक्ष्य आहे. तुम्ही मागील दहा वर्षात माझं काम पाहिलं आहे. आज मी तुमच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि विकसित भारत बनवण्यासाठी आशीर्वाद मागायला आलो आहे. एनडीए आघाडीला किती मोठा विजय मिळणार आहे, हे या सभेतून स्पष्ट होत आहे. इंडिया आघाडीचा मुख्य पक्ष काँग्रेसचा दारुण पराभव होत असल्याचं दिसत आहे. ते विरोधी पक्षातही बसणार नाहीत, असंही मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com