PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मणिपूर दौरा; सुरक्षेत वाढ
थोडक्यात
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये सुरक्षेत वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी मणिपूर दौऱ्यावर
इम्फाळ आणि जिल्हा मुख्यालय असलेल्या चुराचंदपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडेकोट
( PM Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी मणिपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. इम्फाळमधील कांगला किल्ला आणि चुराचंदपूरमधील शांतता मैदानाभोवती मोठ्या संख्येने राज्य पोलीस तसेच केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी पंतप्रधानांचा सार्वजनिक कार्यक्रम होणार असल्याने व्यासपीठ उभारणीची कामे सुरू आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांगला किल्ल्याभोवती काटेकोर तपासणीसह प्रशिक्षित श्वानदलांची गस्त ठेवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांचा किल्ला परिसरात प्रवेश बंद करण्यात आला असून सर्व हालचालींवर कडक नजर ठेवली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण परिसरात सुरक्षा तपासणी सुरू आहे.
मोदी मिझोरामहून मणिपूरला आगमन करतील अशी शक्यता वर्तवली जात असली तरी अधिकृत वेळापत्रकाबाबत अद्याप औपचारिक घोषणा झालेली नाही. तरीदेखील, राज्य सरकार आणि सुरक्षा दलांकडून पूर्वतयारीसाठी विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, मणिपूर सरकारने नागा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड नागा कौन्सिल (यूएनसी) यांना राष्ट्रीय महामार्गावरील आर्थिक नाकेबंदी मागे घेण्याची विनंती केली आहे. मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांनी पाठवलेल्या पत्रात भारत-म्यानमार सीमाभिंतीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडून यूएनसीशी संवाद सुरू असल्याचे सांगितले आहे.