Vaishnavi Hagawane Case : हगवणे पिता-पुत्रांना थार गाडी देणाऱ्याविरोधातही पोलिसात तक्रार; समोर आले अनेक धक्कादायक खुलासे

Vaishnavi Hagawane Case : हगवणे पिता-पुत्रांना थार गाडी देणाऱ्याविरोधातही पोलिसात तक्रार; समोर आले अनेक धक्कादायक खुलासे

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे अनेक धक्कादायक आणि गुंतागुंतीचे पैलू समोर येत आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे अनेक धक्कादायक आणि गुंतागुंतीचे पैलू समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार होण्यासाठी जी थार गाडी वापरली होती, ती गाडी संकेत चोंधे यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, संकेत चोंधे यांच्या पत्नी धनश्री चोंधे यांनी खडक पोलीस ठाण्यात आपल्या पती आणि दीराविरोधात छळवणुकीची तक्रार दाखल केली होती. मात्र, या तक्रारीवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप धनश्री चोंधे यांनी केला आहे.

धनश्री चोंधे यांच्या मते, संकेत चोंधे याच्यावर कारवाई न होण्यामागे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचा हात आहे. राजेंद्र हगवणे, जालिंदर सुपेकर आणि संकेत चोंधे यांच्याशी चव्हाण यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळेच तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणावर आता शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील पत्रकार परिषद घेत सरकारला धारेवर धरले आहे. अंधारे म्हणाल्या, "आम्ही गृहमंत्र्यांना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही विनंती करतो की, पोलीस खात्यात गुन्हेगारी वाढत असल्यास त्यास आळा घालणे आणि अशा घटनांची चौकशी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे."

यावेळी त्यांनी शशिकांत चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा करत एक एफआयआर सादर केला. त्या म्हणाल्या की, "शशिकांत चव्हाण यांच्यावर 307 (खूनाचा प्रयत्न), 323, 141, 143, 147, 148, 149, 120 यासारखी गंभीर कलमे असलेला गुन्हा दाखल आहे. या एफआयआरमध्ये चव्हाण सातवा आरोपी आहे. त्याचा पत्ता स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे आणि सध्या ते केवळ जामिनावर बाहेर आहेत."

अंधारे यांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, "ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीला जामिनावर सुटूनही पदोन्नती कशी मिळते, हा मोठा प्रश्न आहे. यामध्ये वरिष्ठ पातळीवरील हस्तक्षेप आहे का, याची चौकशी झाली पाहिजे."

वैष्णवी हगवणे प्रकरणातील वाढत चाललेली गुंतागूंत आणि पोलीस खात्याच्या भूमिकेबाबत उभे राहिलेले प्रश्न आता आणखी गंभीर वळण घेऊ लागले आहेत. याप्रकरणी गृहमंत्रालय आणि तपास यंत्रणांकडून स्वतंत्र चौकशी होण्याची मागणी आता अधिकच तीव्र झाली आहे.

हेही वाचा

Vaishnavi Hagawane Case : हगवणे पिता-पुत्रांना थार गाडी देणाऱ्याविरोधातही पोलिसात तक्रार; समोर आले अनेक धक्कादायक खुलासे
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी वापरला अनुसूचित जाती घटकांचा 410 कोटींचा निधी
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com