Political atmosphere in Maharashtra heats up after Ajit Pawar's death; Sanjay Raut attacks BJP
Political atmosphere in Maharashtra heats up after Ajit Pawar's death; Sanjay Raut attacks BJP

Sanjay Raut : अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपमधील संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. एकीकडे त्यांच्या निधनावरून विविध तर्क-वितर्क लावले जात असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपमधील संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी थेट आरोप करत म्हटलं की, अजित पवारांचा पक्ष हा आता स्वतंत्र निर्णय घेण्याच्या स्थितीत राहिलेला नाही. “अजितदादांचा पक्ष हा अमित शहांचा 100 टक्के गुलाम झालेला पक्ष आहे,” असं स्पष्ट विधान त्यांनी केलं.

संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे स्वतः आपल्या पक्षाचे प्रमुख होते आणि त्यांनी स्वतःच्या इच्छेने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजप हा महाराष्ट्राच्या विचारांचा पक्ष नाही, हे अजित पवारांना उमगलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्येक विषयावर चर्चा होतच असेल असं नाही. जर अजित पवारांनी फडणवीस यांच्याशी काही मुद्द्यांवर चर्चा केली नसेल, तर याचा अर्थ त्यांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता, असंही राऊत यांनी सूचित केलं.

“जर अजित पवार स्वगृही परत येण्याच्या विचारात असतील, तर त्यासाठी फडणवीसांशी चर्चा करण्याची गरजच काय होती?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. फडणवीसांचा पक्ष हा महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात काम करणारा असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या भूमिकेवर भाजप आहे, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

संजय राऊत पुढे म्हणाले की, अजित पवारांसारखा नेता अशा विचारसरणीशी फार काळ तडजोड करू शकत नाही, हे सर्वांनाच माहिती होतं. अजित पवारांसोबत ठाकरे गटाच्या नेत्यांच्याही चर्चा सुरू होत्या. दोन्ही पक्षांमध्ये ‘मूळ प्रवाहात परत येण्याबाबत’ हालचाली सुरू असल्याची माहिती अनेकांना होती.

“आज दादा आपल्यात नाहीत, म्हणून त्यांच्या नावावर राजकीय हिशेब चुकते करू नयेत. त्यांच्या नावावर बिल फाडण्याचा प्रयत्न करू नये,” असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. अखेरीस त्यांनी पुन्हा एकदा ठाम शब्दांत म्हटलं की, सध्याच्या घडीला अजित पवारांचा पक्ष हा पूर्णपणे अमित शहांच्या नियंत्रणाखाली असून स्वतंत्र राजकीय अस्तित्व गमावून बसला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com