ZP elections :  जिल्हा परिषदेतील राजकीय वारसा; नेत्यांच्या नातेवाईकांनी सत्ता ठोकली

ZP elections : जिल्हा परिषदेतील राजकीय वारसा; नेत्यांच्या नातेवाईकांनी सत्ता ठोकली

राज्यातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आज निकाल हळूहळू समोर येत आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आज निकाल हळूहळू समोर येत आहेत. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत पुणे, सोलापूर, रायगड, रत्नागिरी आणि परभणीसारख्या जिल्ह्यांमध्ये नेत्यांच्या वारसांनी विजयाची झेंडी रोवली.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी निर्णायक विजय मिळवला. पारगाव जरकवाडी गटातून त्यांनी तिसऱ्या फेरीत २१३० मतांची आघाडी घेत बाजी मारली. तसेच, पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी होऊन पक्षाची पकड मजबूत केली. पुरंदर तालुक्यातील दोन्ही पंचायत समिती सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाले, ज्यामुळे पक्षाचा प्रभाव या भागात वाढला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात माजी मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे आणि शिवाजीराव सावंतांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांनी ६,८०० मतांच्या प्रचंड आघाडीने विजयी होऊन आपले राजकीय प्रभुत्व सिद्ध केले. याच तालुक्यात भाजपच्या नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला, ज्यामुळे भाजपच्या कुटुंबीयांच्या राजकीय वाटचालीत नवीन अध्याय उघडला आहे.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघात आमदार भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव विजयी झाले. त्यांनी पहिल्या फेरीपासूनच ५७१ मतांची आघाडी घेत बाजी मारली. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात आमदार भरत गोगावले यांचे पुत्र चिरंजीव विकास गोगावले यांनीही विजयी होऊन आपल्या कुटुंबाचा वारसा कायम ठेवला. या निवडणुकीत महत्त्वाचे म्हणजे प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपली सत्ता वाढवली आहे.

पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये विजयी झालेल्या वारसांनी स्थानिक राजकारणावर आपला प्रभाव दाखवला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षवार स्थिती बघितल्यास भाजपने अनेक ठिकाणी आघाडी घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही भाग टिकवले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. राजकीय विश्लेषक म्हणतात की या निवडणुकीत नातेवाईकांच्या यशामुळे स्थानिक राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. ही निवडणूक महत्त्वाची कारण ती ग्रामीण भागातील सत्ता आणि जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com