हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज दिवसभरात काय काय घडलं?
राज्यात पुन्हा एकदा मंदिरावरून राजकारण तापलं आहे. दादरचं 80 वर्षे जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीचं जुंपली आहे. हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. तरीही विविध राजकीय नेते या मंदिराला भेट देत आहेत. भाजप नेते मंगलप्रभात लोढा, किरीट सोमय्या, रवी राणा आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं आहे.
नेमका काय आहे वाद?
दादर रेल्वे स्थानकाबाहेरील हनुमानाचे मंदिर हे अनधिकृत असल्याचं म्हणत मध्य रेल्वेने हे मंदिर हटवण्यासाठी नोटीस पाठवली आहे. साधारण 80 वर्षे जुने असलेले हे हनुमानाचे मंदिर राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडलं. त्यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात केंद्र सरकारवर टीका केली होती. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
आज दिवसभरात काय काय घडलं?
मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित- मंगलप्रभात लोढांची मोठी घोषणा
दादरमधील हनुमान मंदिर सुरुच राहणार असल्याची मोठी घोषणा मंगलप्रभात लोढांनी केली आहे. आदित्य ठाकरे हनुमानाच्या दर्शनासाठी जाण्याआधीच मंदिर हटवण्याच्या निर्णयाची स्थगितीची घोषणा करण्यात आली. लोढा यांनी दादरमधील हनुमान मंदिराला भेट दिल्यानंतर हे स्पष्ट केले की, मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
किरीट सोमय्यांच्या भेटीदरम्यान ठाकरेंची शिवसेना- भाजप आमनेसामने
भाजपा नेते किरीट सोमय्या हनुमान मंदिरामध्ये दर्शन करण्याकरता आले असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सोमय्या यांना काढता पाय काढावा लागला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी केली आरती
ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन दादर येथील हनुमान मंदिरात आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी आरती केली आहे.
दरम्यान, भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी केलेले ट्वीट पाहा-