Bombay High Court : भटक्या श्वानांना अन्न देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
(Bombay High Court) मुंबई उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ठरावीक किंवा योग्य नसलेल्या ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यास विरोध करणे हा भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा ठरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच पुण्यातील एका सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ कुत्र्यांना अन्न देण्यास आक्षेप घेतल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या सहकाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा न्यायालयाने रद्द केला आहे.
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदीप पाटील यांच्या खंडपीठासमोर झाली. न्यायालयाने स्पष्ट मत व्यक्त केले की, फूटपाथ, शाळेच्या बस थांब्याजवळ किंवा ज्या ठिकाणी लहान मुले बसमध्ये चढतात-उतरतात, अशा ठिकाणी कुत्र्यांना अन्न देऊ नये, असे सांगणे हे चुकीचे किंवा कायद्याविरोधी नाही.
न्यायालयाने असेही नमूद केले की, संबंधित व्यक्तीने तक्रारदार महिला आणि तिच्या मैत्रिणींना ज्या ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घातला जात होता, ते अधिकृत ‘फीडिंग स्पॉट’ नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत अन्न देण्यास आक्षेप घेणे हा गुन्हा ठरू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

