PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार
थोडक्यात
पंतप्रधान मोदी आजपासून 5 राज्यांच्या दौऱ्यावर
आज मणिपूरला देणार भेट
2023च्या हिंसाचारानंतर मोदींचा पहिलाच मणिपूर दौरा
(PM Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी (13 सप्टेंबर) मणिपूर दौर्यावर जाणार आहेत. मे 2023 मध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये झालेल्या भीषण हिंसाचारानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्या काळातील जातीय संघर्षात तब्बल 260 लोकांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 60,000 नागरिकांना विस्थापित व्हावे लागले होते. सध्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असून, सुरक्षा यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस दलासह CRPF, BSF आणि आसाम रायफल्सचे दहा हजार जवान तैनात असतील.
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी 7,300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांना सुरुवात करणार आहेत. चुराचांदपूर येथे रस्ते व जलनिस्सारण सुधारणा, राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार, माहिती-तंत्रज्ञान प्रकल्प आणि कामगार महिलांसाठी वसतिगृहे उभारणी अशा मोठ्या योजनांची पायाभरणी होईल. तसेच इंफाळमध्ये सचिवालय इमारत, नवीन पोलीस मुख्यालय आणि इतर महत्त्वाच्या सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांचा हा दौरा केवळ मणिपूरपुरता मर्यादित नसून, ते आसाम आणि मिझोरममध्येही विकास प्रकल्पांना प्रारंभ करणार आहेत. या तीन राज्यांसाठी मिळून तब्बल 36,000 कोटींच्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.