Priya Marathe : प्रिया मराठेच्या अचानक जाण्याने कलाविश्वात हळहळ; ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणाल्या की, "त्या पोरीने नुकताच..."
Actress Priya Marathe death Usha Nadkarni cry : मराठी आणि हिंदी मालिकेच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधन झाले आहे. केवळ 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. आज म्हणजेच रविवारी पहाटे कर्करोगाशी झुंज संपली. तिच्या अश्या अचानक जाण्याने कलाविश्वात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा शोक व्यक्त करताना आवाज भरून आला. त्या म्हणाल्या की, “मला खरंच फार वाईट वाटतंय. मी अंकिताला भेटले होते, तेव्हा आम्ही ठरवलं होतं की, प्रियाला भेटायला जायचं. पण अंकिता म्हणाली की शंतनू म्हणतो, 'येऊ नका', कारण तिची परिस्थिती भेटायला योग्य नव्हती, कदाचित केस गळत असतील वगैरे. तरी मी म्हटलं होतं की आपण तरी जाऊया. पण वाटलं नव्हतं ती इतक्या लवकर जाईल. असं व्हायला नको होतं. देव का असं करतो, हे समजत नाही. त्या पोरीने नुकताच संसार उभा केला होता. तिचं जायचं वय नव्हतं. देव तिच्या आत्म्याला शांती देवो.”
चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर यांनी देखील शोक व्यक्त केला.
“प्रिया मराठे यांची एक्झिट खूप चटका लावणारी आहे. गणेशोत्सव सुरू असताना अशी दु:खद बातमी ऐकावी लागणं, हे अधिकच वेदनादायक आहे. दिवसाची सुरुवात अशा बातम्यांनी होणं त्रासदायक आहे. अनेक कलाकार आपल्या खासगी आयुष्यात जे संघर्ष करतात, ते आपणास कळतच नाही. जेव्हा अशा बातम्या अचानक समोर येतात, तेव्हा खूप मोठा धक्का बसतो.”
प्रिया मराठेच्या कामाविषयी सांगण्याचे झाले तर, प्रियाने ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून भूमिका साकारल्या. दमदार अभिनय आणि वेगळ्या शैलीतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मागील काही महिन्यांपासून प्रिया अभिनयापासून दूर होती आणि सोशल मीडियावरही सक्रिय दिसत नव्हती.
तिने शेवटची भूमिका ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत साकारली होती. मात्र आरोग्याच्या अडचणींमुळे तिला ही मालिका मधेच सोडावी लागली. त्यावेळी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना ही माहिती दिली होती. “शूटिंगचं वेळापत्रक आणि माझं आरोग्य एकत्र सांभाळणं कठीण होतं. त्यामुळे मला हा प्रवास इथेच थांबवावा लागतोय,” असं तिने सांगितलं होतं.
प्रियाच्या अचानक झालेल्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांपासून ते सहकलाकारांपर्यंत सर्वांनी दुःख व्यक्त केलं आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी तिचा जीव कर्करोगाने घेतल्याने मराठी व हिंदी कलाविश्वाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.