Priyanka Gandhi
Priyanka Gandhi

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. त्या उद्गीर येथे काँग्रेसच्या जाहीर सभेत बोलत होत्या.
Published by :

महाराष्ट्रात पैशांच्या जोरावर आमदारांना विकत घेतलं आणि तुमच्या डोळ्यासमोर महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. लोकशाही तुम्हाला वाचवतं. संविधान तुम्हाला वाचवतं. देशाच्या संविधानात प्रत्येकाला समान अधिकार आहे. पण आपल्या डोळ्यासमोर याविरोधात काही ना काही घडत आहे. आम्हाला ४०० जागा द्या, आम्ही संविधानही बदलून टाकू, असं विरोधक सांगतात. तुमचे अधिकार कमकुवत करण्यासाठी ते संविधान बदलण्याचा कारस्थान करतात. लोकशाही कमकुवत होत असल्याने या देशात लोकांनी बदल घडवून आणला पाहिजे. मोदी म्हणतात, भ्रष्टाचार थांबवणार. पण मोदींनी इलेक्टोरेल बॉण्डची स्किम का काढली, कारण जे कुणी राजकीय पक्षांना हप्ते देतात, त्यांचे नाव या स्किममध्ये गुपित राहतं. पण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, ही स्किम चुकीची आहे. त्यानंतर लिस्ट समोर आली आणि या लोकांची पोलखोल झाली. मोदी सरकार वसुली करत होतं. मोदी जनतेची फसवणूक करत आहेत. दहा वर्ष तुम्ही भोगलं आहे. पण आता तुम्ही पुन्हा मोदी सरकारला मत दिलं, तर अजून तुम्हाला पाच वर्ष भोगावं लागेल, असं म्हणत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. त्या उद्गीर येथे काँग्रेसच्या जाहीर सभेत बोलत होत्या.

जनतेशी संवाद साधताना प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी तुमच्यासमोर आली आहे. आज आपला देश कुठे आहे आणि तुम्ही कुठे उभे आहात, हे गांभीर्यान समजून घ्या. मागील ४५ वर्षात देशात जेव्हढी बेरोजगारी नव्हती, तेव्हढी आज आहे. ७० कोटी लोक बेरोजगार आहेत. केंद्रात ३० लाख पदे रिक्त आहेत, जे नरेंद्र मोदी सरकारने भरले नाहीत. तुम्ही तुमच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करत आहेत.

मागील दहा वर्षात समस्या वाढल्या आहेत. फक्त बेरोजगारी नाही, तर महागाई प्रमाणाच्या बाहेर वाढली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून १२०० रुपयांचं सिलिंडर गॅस तुम्ही खरेदी करत आहात. पण निवडणुका आल्यावर मोदींनी गॅसची किंमत ४०० रुपये केली. महिला घरातील सर्व ओझं उचलतात. सरकारकडून तुम्हाला काहीही दिलं जात नाही. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतीच्या प्रत्येक वस्तुवर जीएसटी लावलं आहे.

देशात महागाई वेगानं वाढत आहे. तुम्ही संकटात आहात. तुम्ही टीव्ही चालू केला तर, तुम्हाल हेच दिसतं सर्वकाही चांगलं आहे. मोदी कधी आफ्रिकेत, जापानमध्ये तर कधी युरोपात दिसतात. तुम्हाला असं वाटतं, देशात खूप काही चांगलं चाललं आहे. आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गेल्या दहा वर्षात रोजगार बंद केले. महागाई वाढवली. कर्नाटकमध्ये गरिब कुटुंबातील महिलेला प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये मिळतात.

पण मोदींनी दहा वर्षात देशाला काय दिलंय? कुटुंब कितीही गरिब असो, सर्वांना वाटतं त्यांच्या मुलांनी शिकावं आणि त्यांना चांगली नोकरी मिळावी. पण आज परिस्थिती अशी आहे, मुलांना तुम्ही शिक्षण देत आहेत आणि सरकार तुम्हाला पाच किलो रेशन देत आहेत. ते सांगतात हेच तुमचं भविष्य आहे. पाच किलो रेशनमुळे तुमचं भविष्य उज्वल होणार आहे का, तुम्ही जे काही खरेदी करता, ते महाग झालं आहे. सोन्याचा भाव ७३ हजारांवर गेला आहे. चांदीचे भाव ९० हजारांवर गेले आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी सरकारने त्यांच्या अरबपती मित्रांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले. पण देशाच्या शेतकऱ्यांसाठी एकही रुपया माफ केला नाही. जेव्हा शेतकरी दिल्लीत आंदोलन करत होते, जेव्हा ६०० शेतकरी शहीद झाले, नरेंद्र मोदी घरातून बाहेर निघाले नाहीत. शेतकऱ्यांसोबत बोलले नाहीत. जेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांना पायाखाली तुडवलं, तेव्हा मोदींनी काहीच केलं नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर यांची नौटंकी सुरु होते. मागील निवडणुकीतही मी तुम्हाला सांगितलं होतं, हे लोक निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा करतात.

तुमच्या खात्यात १५ लाख देणार, दोन कोटी लोकांना रोजगार देणार, अशी आश्वासने देतात. पण कुणाच्या खात्यात जमा झाले १५ लाख रुपये, कुणाला रोजगार मिळाला, तरीही तुम्ही त्यांना मत दिलं. आता दहा वर्ष झाले आहेत. तुमच्या मुलांना रोजगार मिळत नाही. महिलांवर अत्याचार झाल्यावर मोदी सरकार गुन्हेगारांना वाचवतात. हे सत्य तुम्हाला सांगायचं आहे. ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणाऱ्या महिलांचं मोदींनी घरात स्वागत केलं. पण त्याच महिला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरल्या, पण मोदींनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com