Manoj Jarange Patil : मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू; जरांगेंच्या उपोषणापूर्वी  दु:खद बातमी

Manoj Jarange Patil : मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू; जरांगेंच्या उपोषणापूर्वी दु:खद बातमी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्नरजवळील प्रवासादरम्यान सतीश देशमुख या मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबईतील जरांगेंच्या उपोषणापूर्वीच घडलेल्या या घटनेने संपूर्ण आंदोलनात हळहळ व्यक्त होत आहे.

27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील व हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले होते. आज सकाळी जरांगे पाटील शिवनेरीवर पोहोचले व पुढील प्रवासासाठी सज्ज झाले. याचवेळी जुन्नर परिसरात ही दुर्घटना घडली. प्रवासादरम्यान दम लागल्याने सतीश देशमुख यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी शोक व्यक्त करताना तीव्र प्रतिक्रिया दिली. "आमच्या देशमुख बांधवांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. यासाठी फडणवीस साहेब जबाबदार आहेत. जर तुम्ही आरक्षण दिले असते तर असे बळी गेले नसते. लातूरमध्येही दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली. आज पुन्हा आमच्या समाजातील बांधवाने प्राण गमावला," असे ते म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी प्रशासनाने मनोज जरांगेंना फक्त 8 तासांची परवानगी दिली आहे. पोलिसांना हमी देऊन जरांगेंनी ही परवानगी मान्य केली असली तरी, शिवनेरीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळीच भूमिका सूचित केली. "फक्त एका दिवसाची किंवा काही तासांची परवानगी ही चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलनाची परवानगी दिली पाहिजे," अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, "रायगड, शिवनेरीवरून आम्हाला प्रेरणा मिळते. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. न्यायालयाने सांगितलेल्या अटीशर्ती काढून टाकाव्यात. जाणूनबुजून सरकार एक दिवसाची परवानगी देते, ही अन्यायकारक गोष्ट आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com