Maharashtra Kesari ची गदा पृथ्वीराज मोहोळने पटकावली, महेंद्र गायकवाडला केलं चारीमुंड्या चीत
67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळ अखेर विजेता ठरला आहे. गोंधळानंतर सुरू झालेल्या अंतिम सामन्यात पृथ्वीराज पहिल्यापासूनच आघाडीवर होता. काहीवेळानंतर सामन्यादरम्यान गोंधळ झाला. तो गोंधळ पोलिसांनी थांबवला आणि काही क्षणांतच महेंद्र गायकवाडनं वेळ संपण्याआधीच मैदान सोडल्यानं पृथ्वीराज मोहोळला पंचांनी विजेता घोषित केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळला चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील उपांत्य फेरीत गोंधळ आणि वादाची स्थिती निर्माण झाली. कुस्तीपटू शिवराज राक्षे पराभव झाल्याची घोषणा झाल्यानंतर चिडला आणि त्याने पंचांना लाथ मारल्याचा आरोप केला जात आहे. शिवराजने त्याच्यावर झालेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि पाठ टेकली नसल्याचे सांगत वाद निर्माण केला. तथापि, पृथ्वीराज मोहोळला विजेता म्हणून घोषित करण्यात आले.
अंतिम फेरीत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड आमनेसामने आले. महेंद्र गायकवाड सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. या सामन्यात पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडला हरवले आणि स्पर्धेचा विजेता ठरला. पृथ्वीराजने 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
पाच मिनिटांच्या चुरशीच्या लढतीत पृथ्वीराजने यशस्वी डाव टाकला, ज्यामुळे महेंद्र गायकवाडला हार मानावी लागली आणि तो मैदान सोडून गेला. विजयानंतर पृथ्वीराजच्या सहकाऱ्यांनी आनंद व्यक्त करत त्याला खांद्यावर घेतले आणि आखाड्यात मिरवणूक काढली.
विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज मोहोळला चांदीची गदा प्रदान केली आणि त्याला थार गाडी बक्षीस म्हणून दिली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
दरम्यान, अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याला गालबोट लागलं होतं. मॅट प्रकारामध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. यावेळी पृथ्वीराज मोहोळला पंचांनी विजेता घोषित केलं. त्यानंतर संतापलेल्या शिवराज राक्षेनं पंचांना ओढत लाथ मारली. पाठच टेकली नसल्याचं म्हणत शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली. शिवराज राक्षेनं आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हटलं होतं.