Pune Accident : भोर-महाड मार्गावर जीवघेणा अपघात; खड्ड्यात कार कोसळून मुंबईकराचा मृत्यू
थोडक्यात
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघात झाला आहे.
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदून ठेवलेला, पण न झाकलेला खड्डा जीवघेणा ठरला.
घाटकोपर-मुंबई येथील राहुल विश्वास पानसरे (४५) यांचा मृत्यू झाला.
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यावरील अपूर्ण कामांची भीषणता समोर आणली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदून ठेवलेला, पण न झाकलेला खड्डा जीवघेणा ठरला. यात घाटकोपर-मुंबई येथील राहुल विश्वास पानसरे (४५) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहप्रवासी राहुल देवराम मुटकुले (३२) हे गंभीर जखमी झाले.
दोघेही गणपतीपुळे दर्शनासाठी निघाले होते. रात्री साडेदोनच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे रस्ता अस्पष्ट दिसत होता. त्याचवेळी त्यांची टोयोटा कार (MH 12 HZ 9299) शिरगाव परिसरात थेट मोरीच्या खड्ड्यात कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, पानसरे यांचा जागीच मृत्यू झाला.
भोर पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ, पोलिस पाटील शंकर पारठे आणि वक्रतुंड क्रेन सर्व्हिसच्या मदतीने मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आला. पानसरे यांचा मृतदेह भोर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला, तर गंभीर जखमी मुटकुले यांना महाडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, भोर-महाड मार्गाचे रुंदीकरण आणि सुधारणा काम गेल्या सहा-सात महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी मोऱ्या बसवण्यासाठी मोठे खड्डे खोदून ते खुल्या अवस्थेतच सोडण्यात आले आहेत. पावसाळ्यात हे खड्डे चिखलाने भरतात, त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना रस्ता न समजल्याने जीव धोक्यात येतो.
या अपघातामुळे अपूर्ण कामाचा पहिला बळी गेला असून, रस्ते प्रशासनाच्या निष्काळजीपणावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “काम तातडीने पूर्ण करून सुरक्षितता सुनिश्चित करण्यात यावी, अन्यथा अशा दुर्घटना थांबणार नाहीत,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.