Pune Rain Update : पुण्यालाही पावसानं झोडपलं; दहा वर्षांचा विक्रम मोडला
पुण्यात यंदा मे महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून, मागील दहा वर्षांचा विक्रम मोडण्यात आला आहे. 1 मे ते 21 मे या कालावधीत शहरात तब्बल 110 मिमी पावसाची नोंद झाली. 2015 साली या काळात 106 मिमी पाऊस झाला होता. यामुळे पुण्यात मे महिन्यातील सर्वाधिक पावसाचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे.
सामान्यतः पुण्यात मे महिन्यात सरासरी 31.4 मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा आठवडाभर पडलेल्या सरी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा आकडा 100 मिमीच्या वर गेला आहे. शिवाजीनगरमध्ये एका दिवसात 40.5 मिमी, तर चिंचवडमध्ये एका रात्रीत 101 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला, एनडीए परिसरातही पावसाने शंभरी ओलांडली.
सध्या अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे वातावरणात बाष्पाचे प्रमाण वाढून त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, कोकण आणि पुणे परिसरावर होत आहे. परिणामी, या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत.
बुधवारी दुपारी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, संध्याकाळी उशिरा पुन्हा एकदा शहरात विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. बावधन, सिंहगड रस्ता, कोथरूड, कात्रज आदी भागांत पावसाने रस्ते ओले केले. रात्री उशिरापर्यंत वीज आणि गडगडाटासह पावसाचा जोर कायम होता.
हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी म्हणजे 28 मे पर्यंत पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, नांदेड, बुलढाणा आणि यवतमाळसह इतर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' काहींना 'ऑरेंज' अलर्ट', तर काहींना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.