पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार

पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार

आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे. 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे. 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नऊशेहुन अधिक पैलवान सहभागी होणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती 'महाराष्ट्र केसरी'चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

भव्य 32 एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून त्यात 12 एकरमध्ये 80 हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे आहेत. अतिमहत्वाच्या व्यक्ती, पैलवान, महिला, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आल्या आहेत. 20 एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचे चोख नियोजन केले आहे. एका कार्डिअॅक अॅम्ब्युलन्ससह चार अॅम्ब्युलन्स, डॉक्टरांची टीम, 1000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. सह्याद्री आणि जहांगीर हॉस्पिटल आणि क्रस्ना डायग्नोस्टिक आरोग्य व्यवस्था पाहणार आहे. अशी माहिती काल पत्रकार परिषद घेऊन सांगितली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी या स्पर्धेवर आक्षेप घेत ही स्पर्धा अधिकृत नसल्याचा आरोप केला आहे. मात्र या स्पर्धेला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता असल्यानं ही स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com