Pune : गुडलक कॅफेमध्ये 'बन मस्का'त सापडला काचेचा तुकडा
पुणे शहरातील प्रसिद्ध गुडलक कॅफे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, मात्र यावेळी कारण चिंताजनक आहे. कॅफेमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रसिद्ध बन मस्का पावमध्ये काचेचा तुकडा आढळून आला असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने गुडलक कॅफेमध्ये इराणी चहा आणि बन मस्का ऑर्डर केला होता. जर हा तुकडा पोटात गेला असता तर गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुदैवाने त्या ग्राहकाला कोणतीही शारीरिक हानी झाली नसली तरी पुणेकरांनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे.
या प्रकाराची माहिती गुडलक कॅफेच्या व्यवस्थापनाला देण्यात आली असता त्यांनी ती मान्य केली. व्यवस्थापनाने यासंदर्भात तपास सुरू केला असून, “सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही सखोल चौकशी करू आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊ,” असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकांनी कॅफेच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
पुण्यातील जुनी आणि लोकप्रिय खाद्यसंस्कृती जपणाऱ्या गुडलक कॅफेप्रमाणे प्रतिष्ठित संस्थेकडून अशा प्रकारची दुर्लक्ष होणे ही दुर्दैवी बाब मानली जात आहे.