Pune News : PMPMLच्या बस भाड्यात दहा वर्षांनंतर वाढ; 1 जूनपासून नवीन दर लागू
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पीएमआरडीए PMRDA हद्दीत प्रवासी सेवेसाठी कार्यरत असलेल्या पुणे महानगरपरिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने बस प्रवासांच्या दरात दहा वर्षांनंतर मोठीवाढ जाहीर केली आहे. सुधारित भाडे रचना 1 जून 2025 पासून लागू होणार असून, त्यानुसार प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य शासनाच्या 31 मार्च 2018 रोजीच्या अधिसूचनेच्या आधारावर आणि इतर परिवहन संस्थांच्या दरवाढीच्या पद्धतीवर विचार करून पीएमपीएमएलने बस प्रवासासाठी टप्पेनिहाय सुधारित दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला संचालक मंडळ आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांची मंजुरी मिळाली आहे.
नवीन रचनेनुसार एकूण 11 टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. एक ते 30 किलोमीटरपर्यंत प्रत्येक पाच किलोमीटरसाठी एक टप्पा आणि 30 ते 80 किलोमीटरसाठी प्रत्येक दहा किलोमीटर अंतरासाठी एक टप्पा ठेवण्यात आला आहे. सुधारित दर पुढीलप्रमाणे असतील:
5 किमीपर्यंत – 10
5.1 ते 10 किमी – 20
10.1 ते 15 किमी – 30
15.1 ते 20 किमी –40
त्यानुसार, जास्त अंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक भाडे द्यावे लागेल.
याशिवाय, पीएमपीएमएलने दैनंदिन व मासिक पासच्या दरातही वाढ केली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दैनंदिन पासचा दर 40 वरून थेट 70 करण्यात आला आहे. पीएमआरडीए हद्दीतील दैनंदिन पास 120 ऐवजी आता 150 रुपये लागेल. मासिक पाससाठीचा दर 900वरून वाढवून 1500 करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी लागू असलेल्या सवलती यथावतरित ठेवण्यात आल्या आहेत. ही नवीन भाडेवाढ 1 जूनच्या पहाटेपासून अंमलात येणार आहे.