Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर फक्त 2 तासात पार होणार; नितीन गडकरींकडून मोठी घोषणा
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला पुणे ते संभाजीनगर रस्ता आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुणे ते संभाजीनगर रस्ता नवीन होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. पुणे ते संभाजीनगर 16 हजार 318 कोटी रुपये खर्च करुन नवीन एक्सप्रेस रोड तयार होणार आहे. पुणे, अहिल्यानगर आणि संभाजीनगर असा रस्ता असणार आहे. तसेच या रस्त्यावर पूल देखील तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. यामुळे पुणे संभाजीनगर हे अंतर अवघ्या दोन तासात पार होणार असं माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पुणे ते संभाजीनगर आम्ही हा नवीन एक्सप्रेस हायवे बांधत आहोत. 16 हजार 318 कोटी रुपये यासाठी खर्च येणार आहे. पुणे (Pune) , अहिल्यानगर (Ahilyanagar) आणि संभाजीनगर (Sambhajinagar) असा याचा एमएयू झाला असून पहिला रस्ता असणार आहे. तो रस्ता आधी पूर्णपणे चांगला करणार आणि यावर काही ठिकाणी पूल बांधले जाणार आहेत यासाठी दोन हजार कोटी खर्च केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, पुणे ते संभाजीनगर रस्ते व्यतिरिक्त एक रस्ता शिक्रापूर येथून जाणार आहे. हा रस्ता अहिल्यानगरच्या बाहेरुन थेट बीड जिल्ह्यात जाईल आणि तेथून तो संभाजीनगरपर्यंत जोडला जाईल. 16 हजार 318 कोटींची तरतूद हा एक ग्रीन फिल्ड हायवे असणार असून यासाठी करण्यात आली असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.
