Pune Crime : पुण्यात आणखीन एक 'वैष्णवी' सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाने संपवलं जीवन, प्रकरण काय?
पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सासरकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण त्रासाला वैतागून एका विवाहित महिलेने आपले जीवन संपवले. दीप्ती मगर-चौधरी असे या महिलेचे नाव असून ती पेशाने इंजिनिअर होती.
काही वर्षांपूर्वी दीप्तीचे लग्न झाले होते. सुरुवातीचे दिवस ठीक गेले, मात्र त्यानंतर तिच्या आयुष्यात त्रास सुरू झाला. पतीसह सासरच्या मंडळींकडून तिला वारंवार अपमानास्पद बोलणे, संशय आणि मारहाण सहन करावी लागत होती. घरकाम, दिसणं आणि वागणूक यावरून तिला कमी लेखले जात होते.
लग्नानंतर तिने दोन वेळा मातृत्वाचा अनुभव घेतला. पहिल्यांदा मुलगी झाल्याने सासरकडून नाराजी व्यक्त झाली. नंतर व्यवसायाच्या कारणावरून आणि गाडी घेण्यासाठी तिच्या माहेरून मोठी रक्कम मागण्यात आली, जी कुटुंबाने दिलीही. मात्र त्रास थांबला नाही.
मानसिक दबाव, आर्थिक मागण्या आणि अमानुष वागणूक यामुळे दीप्ती पूर्णपणे खचली होती. अखेर २५ जानेवारी रोजी तिने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
थोडक्यात
पुण्यात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली.
ही घटना पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे घडली.
मृत विवाहित महिला इंजिनिअर होती.
मृत महिलेचे नाव दीप्ती मगर-चौधरी असे आहे.

