Vasai : बालदिनाच्या दिवशी शाळेतील शिक्षा घातक ठरली! 'त्या' शिक्षेने घेतला चिमुकलीचा जीव
अतिशय धक्कादायक अशी घटना महाराष्ट्राला हादरवून टाकणारी समोर आली आहे. बालदिनाचा उत्साह संपत नाही तोवर एका बालिकेचा मनाला चटका लावणारा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शिक्षिकेने 100 उठाबशा एका 13 वर्षीय बालिकेला काढण्याची शिक्षा दिली, या शिक्षेमुळे विद्यार्थिनी जीवानीशी गेली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेच, त्याशिवाय संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणीही जोर धरत आहे.
नेमकं काय घडलं?
शाळेमध्ये पोहचण्यासाठी दहा मिनिटे उशीर झाल्याचा राग शिक्षिकेला आला. विद्यार्थिनीला 100 उठाबशा राग अनावर न झालेल्या शिक्षिकेने काढण्याची भयावह शिक्षा ठोठावली. या जीवापेक्षा मोठ्या शिक्षेमुळे विद्यार्थीनीची तब्येतच बिघडली व तिला रुग्णालयात दाखल कराव लागलं, पण दुर्देवाने उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. ही संतापजनक घटना वसई पश्चिममधील सातीवली परिसरातल्या श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या विद्यार्थीनीचे नाव अंशिका गौड आहे. ती फक्त 13 वर्षांची होती आणि सहावीत शिकत होती. 8 नोव्हेंबर रोजी अंशिका नेहमीप्रमाणे शाळेमध्ये पोहोचली. पण तिला दहा मिनिटं उशिर झाला होता. याच कारणाने शिक्षिकेने अशिकासह इतर उशिर झालेल्या विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढलं व उठाबशांची शिक्षा सुनावली. सर्व विद्यार्थी उठाबशा काढत राहिले. कोणी मध्येच थांबले. पण, घाबरुन गेलेल्या अंशिकानं सर्व 100 उठाबशा काढल्या. यातच तिची तब्येत बिघडली. दुसऱ्याच दिवशी तिला वसईमधल्या आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याठिकाणाहून तिला मुंबईमध्ये हलवण्यात आलं कारण तिची तब्येत आणखीन बिघडत जात होती. पण शेवटी नको तेच घडलं आणि बालदिनालाच अंशिकाने प्राण सोडले.
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेने शाळेविरोधात तीव्र भूमिका घेत शाळेला टाळं ठोकलं आहे. शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शाळा उघडू देणार नाही, असा इशाला मनसेने दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या शाळेला मान्यताच मिळालेली नाहीये. कोणतीही अधिकृत मान्यता नसलेल्या या शाळेतील शिक्षिकेच्या भयंकर शिक्षेने एका निष्पाप मुलीचा जीव गेला. या प्रकारामुळे पालकांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे व कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.
