Punjab Police : वर्दीमध्ये रील, अंमली पदार्थांची विक्री ; महिला पोलीस बडतर्फ
रील्स बनवण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. मात्र कोणी रील्स बनवावेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये रील्स बनवू नयेत यासाठी काही नियमदेखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे पोलिसांनी खाकी वर्दीमध्ये रील्स बनवू नयेत असे आदेश पोलिस दलाकडून देण्यात आले आहेत. मात्र अनेक पोलिस अंगावर वर्दी असतानादेखील रील्स बनवतात. या प्रकारामुळे पंजाब पोलिस दलातील एका महिला पोलिसला कामावरुन काढून टाकण्याची घटना समोर आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर 17 ग्रॅम अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणीदेखील कारवाई केली आहे.
पंजाब पोलिसांनी सध्या अंमली पदार्थाविरोधात मोहीम उघडली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने अमनदीप यांची गाडी रोखली असता त्यांनी पथकातील पोलिसांनाच धमकविण्याचा प्रयत्न केला. भटिंडा येथे अमनदीप कौर यांच्या आलिशान थार गाडीत अमली पदार्थ आढळून आले. त्यानंतर अमनदीप कौर यांनी तिथून पलायन करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अमनदीप यांच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे. हरियाणामध्ये त्या अमली पदार्थाची विक्री करायच्या असा आरोपदेखील त्यांच्यावर करण्यात येत आहे. अंमली पदार्थांसह महिला पोलीस शिपाई सापडल्यामुळे त्यांना सध्या कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच सरकारी नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे. जर संपत्तीमध्ये काही चुकीचे आढळल्यास त्यावरही जप्तीची कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस मुख्यालयाचे अधिकारी सुखचैन सिंग यांनी दिली.