'महाराष्ट्रात भाजप कशी जिंकली हे जनता जाणते'; मोदींच्या गुजरातमध्ये राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
काँग्रेसचे 84 वे अधिवेशन बुधवार, ९ एप्रिल रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले. या अधिवेशनात काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. तसेच या भाषणात त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. कटकारस्थान करून भाजपने महाराष्ट्रातील निवडणूक जिंकली, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
पुढे राहुल गांधी म्हणाले की, "आम्ही जाती आधारित जनगणना करण्याची मागणी केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती मान्य केली नाही. आम्ही सत्तेत आलो की जाती आधारित जनगणेचा कायदा मंजूर करू. देश आता कंटाळला आहे. तुम्ही बघा बिहारच्या निवडणुकीत काय होतं तर. भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने जिंकली हे तुम्ही तिथे जाऊन लोकांना विचारा. आम्ही निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या मतदारांची यादी विचारत आहोत. ही यादी मागून आम्ही थकलो आहोत. पण अजूनही निवडणूक आयोग आम्हाला महाराष्ट्रातील मतदारांची यादी देत नाहीये," असे राहुल गांधी म्हणाले.